Friday, November 20, 2026

वृत्त क्रमांक

स्वाधार योजनेच्या अर्जांसाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ;  

नवीन, नूतनीकरण व त्रुटी पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांना संधी

नांदेड दि. 20 नोव्हेंबर :- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे आणि त्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन अर्ज, नूतनीकरण अर्ज तसेच प्रलंबित त्रुटी पूर्तता सादर करण्यासाठी सोमवार ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अनुसूचित जातीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले आणि समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते. महानगरपालिका क्षेत्रापासून पाच किलोमीटरच्या आतील तसेच नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व तालुक्याच्या हद्दीतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता पात्र विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. तसेच यापूर्वी योजनेचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून नूतनीकरणाचा (Renewal) अर्ज आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण भरावा. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, त्यांनीही संबंधित त्रुटींची पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत.

विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज सादर करावेत. अर्जाची सद्यस्थिती वेळोवेळी संकेतस्थळावर तपासावी. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रत आपल्या महाविद्यालयांतर्गत स्थापित समान संधी केंद्रामध्ये जमा करणे आवश्यक आहे.

अधिकृत सोशल मीडिया पेज व व्हॉटसॲप ग्रुपवर मिळणार माहिती

स्वाधार योजनेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी समाजकल्याण विभाग, नांदेड कार्यालयाच्या अधिकृत इन्स्टाग्राम व फेसबुक पेजवर samajkalyannanded या नावाने वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली जात आहे. विद्यार्थ्यांनी या अधिकृत पेजला फॉलो करून अद्ययावत माहिती घ्यावी. तसेच कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हावे. अनधिकृत ग्रुप किंवा व्यक्तींकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून राहू नये. काही अडचणी असल्यास समाजकल्याण कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत; विद्यार्थ्यांनी विलंब टाळावा

स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य मिळते. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी आपले नवीन व नूतनीकरण अर्ज परिपूर्ण कागदपत्रांसह सादर करावेत. मुदतीनंतर नूतनीकरण अर्ज भरता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी कोणताही विलंब करू नये, असे आवाहन शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक मतदार यादी पुनरीक्षणाची मोहीम ३० नोव्हेंबर पर्यंत  २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार ;  सुधारित वेळापत्रकानुसार ...