वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 761 शेतकरी ओटीएस कर्जमुक्तीसाठी पात्र
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध, 31 मार्च 2027 पर्यंत रक्कम भरण्याची मुदत
नांदेड, दि. 20 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत एकवेळ समझोता (OTS) घटकासाठी नांदेड जिल्ह्यातील 5 हजार 761 पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची दोन लाख रुपयांवरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यानंतर त्यांना शासनामार्फत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या याद्या संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना सुरू केली असून, कर्जमाफी, एकवेळ समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक आहेत. पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी घटकांतर्गत नांदेड जिल्ह्यातील 2 लाख 2 हजार 73 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 1 लाख 57 हजार 128 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 1 हजार 416 कोटी 40 लाख रुपयांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे.
एकवेळ समझोता घटकासाठी प्रसिद्ध केलेल्या यादीत शेतकऱ्यांचे नाव, विशिष्ट क्रमांक, आधार क्रमांक, बँक व शाखेचे नाव, कर्जखाते क्रमांक, 31 मार्च 2026 अखेरची थकबाकी, ओटीएसनुसार नुसार थकबाकी, शेतकऱ्याने भरावयाची रक्कम आणि शासनामार्फत देय असलेली रक्कम यांचा तपशील नमूद आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील माहिती तपासून आपला हिस्सा संबंधित बँकेत जमा करावा. एकाच बँकेत एकापेक्षा अधिक कर्जखाती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम कोणत्याही एका कर्जखात्यात भरण्याची सुविधा आहे. मात्र, संबंधित खात्यासाठी ओटीएस (OTS) अंतर्गत निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करू नये. याबाबत शेतकऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांकडून आवश्यक मार्गदर्शन घ्यावे.
शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2027 आहे. बँकांकडून दर शुक्रवारी भरणा केलेल्या रकमेची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यानंतर महा आयटीमार्फत रकमेची पडताळणी केली जाईल. थकबाकी अद्ययावत झाल्यानंतर तीन दिवसांनी आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध होईल. यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक असून, अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना निकषांनुसार आणि त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर दोन लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात येईल. शासनाची रक्कम कर्जखात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल.
ओटीएस (OTS) अंतर्गत प्रसिद्ध झालेली ही पहिली यादी असून, बँकांकडून प्राप्त होणाऱ्या माहितीचे संगणकीय संस्करण करून पुढील काळातही पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच, मयत, वयोवृद्ध आणि बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 19 ऑगस्ट 2026 रोजी मानक कार्यपद्धती (SOP) निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment