वृत्त क्रमांक
दुष्काळातही रेशीम शेतीतून लाखोंचे उत्पन्न; नांदेड रेशीम हब बनणार!
• जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न-डॉ. महेंद्र ढवळे यांचे प्रतिपादन
नांदेड, दि. 26 : दुष्काळी परिस्थितीतही कमी पाण्यात आणि योग्य तांत्रिक नियोजनातून रेशीम शेती फायदेशीर ठरू शकते. जिल्ह्यातील 200 हून अधिक शेतकऱ्यांनी चालू हंगामात रेशीम शेतीतून एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला रेशीम उत्पादनाचे प्रमुख केंद्र अर्थात रेशीम हब म्हणून विकसित करण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांनी केले.
सिल्क समग्र-2 योजनेअंतर्गत येथील जिल्हा रेशीम कार्यालय आणि भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (एसबीआय आरसेटी) यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 26 नोव्हेंबरदरम्यान मालेगाव रोड येथील एसबीआय आरसेटीमध्ये सात दिवसीय लाभार्थी सक्षमीकरण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी डॉ. ढवळे बोलत होते. त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी परभणी प्रादेशिक विस्तार केंद्राचे वैज्ञानिक डॉ. अशोक जाधव यांनी रेशीम कीटक संगोपनातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. एसबीआय आरसेटीचे संचालक कैलास जायभाये यांनी स्वयंरोजगार व वित्तपुरवठा योजनांविषयी मार्गदर्शन केले. डीएसटी प्रशिक्षक शिवप्रसाद माळवतकर यांनी तांत्रिक प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले, तर प्रशिक्षण विभागाचे प्राध्यापक आशिष राऊत यांनी प्रशिक्षणादरम्यान झालेली प्रात्यक्षिके व यशस्वी शेतकऱ्यांच्या अनुभवांची माहिती दिली.
जिल्हा रेशीम विकास अधिकारी अशोक वडवळे यांनी नांदेड जिल्ह्यात रेशीम विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन रेशीम शेतीच्या विस्तारासाठी आणि नांदेडला रेशीम हब म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी रेशीम कार्यालयाच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक अमर सूर्यवंशी, नरोजी कोरके, अभय कुलकर्णी, संतोष कोल्हे, अनिल खिल्लारे, गजानन काचगुंडे, दत्ता कुस्कटे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
***
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment