विशेष वृत्त क्रमांक 223
महसूलमधूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
नांदेड दि.२४ फेबुवारी : करिअरच्या धावपळीत आपल्या अंगीभूत कलागुणांना मागे ठेवावे लागते.त्यामुळे महसूल विभागातील खेळाडूंना मिळालेली ही संधी असून कामाचे नियोजन करून कला, क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य प्राप्त करावे.महसूल मधूनही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना गवसणी घालणारे क्रीडापटू तयार झाल्यास मला अधिक आनंद होईल, अशी अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
काल रविवारी रात्री राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.21, 22 व 23 फेब्रुवारीला आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप त्यांच्या हस्ते झाला.
यावेळी आपल्या संबोधनात त्यांनी क्रीडा व कलाक्षेत्रातील गुणवंतांना नोकरी बढतीमध्ये प्राधान्य दिले जाईल असे स्पष्ट केले. महसूल मधून ऑलिंपिकला गवसणी घालणारा एखादा खेळाडू तयार झाल्यास तो आनंदाचा क्षण असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महसूल मंत्री खास महसूल कर्मचाऱ्यांच्या आग्रहास्तव आपल्या व्यस्त कार्यक्रमात नागपूर वरून नांदेड येथे समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित झाले.यावेळी महसूल मधील विविध संघटना, कर्मचारी संघटना, वरिष्ठ अधिकारी यांनी देखील आपल्या मागण्या त्यांच्या समोर सादर केल्या.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रामुख्याने इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार डॉ.अजित गोपछडे,आ.बाबुराव कदम कोहळीकर, आ. तुषार राठोड,आ. राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलिप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक शाहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल,नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी, महसूल मधील संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महसूलच्या आकृतीबंध पासून तर महसूल मधील नोकर भरतीपर्यंत अनेक विषयांवर तातडीने निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच महसूल विभागाच्या आस्थापनांमध्ये वाढ करण्याचे प्रस्ताव आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालय, अपर तहसीलदार कार्यालय, यासोबतच लातूर किंवा नांदेडमध्ये विभागीय महसूल आयुक्तालय करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल खात्यातील मोक्याच्या पोस्टिंग आता कुणाच्या शिफारसीने नाही तर मेरीटवर होतील, असे सांगताना त्यांनी महसूलमध्ये जवळपास 15 नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, 65 अप्पर तहसीलदार कार्यालय तयार करण्याचे प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. |
महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करावे. शासनाला आपल्याकडच्या अशा नाविन्यपूर्ण कल्पनांची माहिती द्यावी. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. महसूल विभागातील सुनावण्या घेताना AI चा वापर पुढील काळात होईल, सुनावण्यामध्ये AI तंत्र अतिशय उपयोगी ठरणार असून, निकालपत्रासाठी AI ची मदत घेऊ अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
गेल्या 10 वर्षात 12 हजार प्रकरणे महसूल विभागात निर्णयासाठी पडून आहेत. रोज 100 सुनावण्या घेतल्या तरी ते कमी होणार नाहीत, त्यामुळे AI ची मदत घेणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
नांदेड येथे १२ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आयोजित क्रीडा स्पर्धासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व टीमचे त्यांनी अभिनंदन केले. राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी एक कोटी अनुदान दरवर्षी देणार
व दरवर्षी राज्यस्तरीय महसूल क्रीडा महोत्सव होईल, अशी घोषणा उपस्थित खेळाडूच्या समक्ष केली.
यावेळी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले ,निलंबन आणि वेतनवाढ रद्द करण्याच्या फाईलवर निर्णय घेण्याची वेळ महसूल मंत्र्यांवर आणू नका, इतके चांगले कामकाज ,जनतेशी समन्वय, कार्यालयीन शिस्त आणि पारदर्शी राहा, महसूल हा महाराष्ट्राचा चेहरा आहे. महसुल खाते क्रमांक एकचे राहील यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी त्यांच्या हस्ते विभागीय स्पर्धेतील विजेते कोकण विभागाला प्रथम, दुसरा क्रमांक यजमान छत्रपती संभाजी नगरला तर पुणे विभागाला तिसरा क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद बहाल करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment