Wednesday, June 14, 2023

 वृत्त 

शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासन आपल्या दारी

- प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर

 

▪️ कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांच्याकडून या अभियानाचा गौरव

▪️ हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

 

नांदेड (जिमाका) दि. 14 :- शासनाशी संबंधित अनेक बाबींसाठी सर्वसामान्यांच्या गरजा निगडीत असतात. यात शासनाच्या विविध विभागांकडून मिळणारी प्रमाणपत्रे ही शासकीय योजनांच्या लाभासाठी आवश्यक असतात. ही कागदपत्रे मिळवतांना नागरिकांची दमछाक होऊ नये, विनासायास त्यांना त्यांची हक्काची प्रमाणपत्रे, कागदपत्रे मिळावेत यादृष्टिने आता जनतेला शासनाच्या दारात नाही तर शासन जनतेच्या दारात पोहचत आहे, ही या अभिनव योजनेची फलनिष्पती असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

 

हदगाव तालुक्यातील पिंपळगाव सर्कल येथे आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, सरपंच आडे, तहसिलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषि अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी आडेराव, बाबुराव कदम, भागवत देवसकर आणि एकात्मिक बालविकास, आरोग्य, महावितरण, मंडळअधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शासकीय व्यवस्थेमध्ये शासनाने जनसेवेसाठी, लोककल्याणकारी योजनांसाठी शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली आहे. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत ही भावना शासन आपल्या दारी अभियानातून प्रभावीपणे रुजली जात असल्याने या उपक्रमाचे विशेष कौतूक करावे लागेल, या शब्दात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी गौरव केला.

 

या अभियानात कृषि, महसूल, सीडीपीओ व इतर विभागासंदर्भात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या लाभार्थ्यांमध्ये रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, आरोग्य तपासणी, स्तनदा माता यांना पोषण आहार, कृषि विभागामार्फत प्रात्यक्षिकासाठी व इतर उद्देशाने बियाणांचे वाटप, शासकीय येाजनेतून ट्रॅक्टर ज्यांना मिळाले असा लाभाधारकांशी संवाद आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांच्या पात्रताधारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप लगेच करण्यात आले.

000000









No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...