पदवीधर मतदारांची नोंदणी अधिक प्रमाणात करा
कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू नये
- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर
औरंगाबाद, दि-31: 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पदवीधर
मतदारांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत सहा नोंव्हेंबर आहे. त्यामुळे कोणताही पात्र पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहू नये
यासाठी विभागातील प्रत्येक पदनिर्देशित निवडणूक
अधिकाऱ्यांनी आपल्या भागातील पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त प्रमाणात नोंदणी
करण्याचे निर्देश विभागीय
आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी संबंधीतांना दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी सुनिल केंद्रेकर
यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांचेसाठी "पदवीधर मतदारसंघ निवडणूक" प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी उदय चौधरी ,उपायूक्त वर्षा ठाकूर, पराग सोमण,अप्पर जिल्हाधिकारी भानूदास पालवे, अविनाश पाठक यांनी पदवीधर मतदारांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तर उपजिल्हाधिकारी श्री.अरगुंडे आणि शिवाजी शिंदे यांनी पदवीधर मतदार संघासाठी
पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रमासंबंधी सादरीकरणाव्दारे उपस्थितांना
मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हाधिकारी
पी.आर.कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचा
समारोप केला.
यावेळी, मतदारांच्या नोंदणीसाठी प्राप्त अर्जांवर तात्काळ अचुक व
गतीने निर्णय घेऊन त्याची संगणक प्रणालीवर नोंद घ्यावी. त्याबाबतचा अहवाल वेळेवर सादर करण्याची सूचना यावेळी
केंद्रेकर यांनी केली.
जिल्हाधिकारी
श्री.
चौधरी यांनी पदवीधर
मतदारांची यादी अद्ययावत करून नवीन पात्र मतदारांची अचुकपणे नोंदणी करण्याच्या
कामास गती देण्याची सुचना केली. सर्व अधिकाऱ्यांनी नमुना नं. 18 नुसार दाखल अर्जाची कसून तपासणी करावी व मुळ अभिलेख्यांशी
ती माहिती पडताळून घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच श्रीमती ठाकूर यांनीही सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी
आपल्या भागातील सर्व शासकीय कार्यालये, सर्व विद्यापीठे येथील पदवीधर मतदार नोंदणीला प्राधान्य
द्यावे व अधिकाधिक पदवीधर मतदारांची नोंदणी करुन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची
सुचना केली.
मतदार नोंदणी नियम १९६० अंतर्गत नियम ३१ (३) अन्वये
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी
पात्र मतदारांची नोंदणी करावयाचा कार्यक्रम ०१ ऑक्टोबरपासून जाहीर झाला आहे. मतदार नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर या कालावधीत
पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम
अर्हता व्यक्तींना नमुना नं.१८ मध्ये मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध आहे. या नोंदणीसाठी एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी
किमान तीन वर्ष अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका इ. धारण करणा-या व्यक्तींना अर्ज करता येणार आहे. नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्रे अथवा राजपत्रित अधिका-याकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक
आहे.
अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या
ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी , पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रक देखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे
प्रमाणित झाले असले पाहिजे.
शासकीय
कार्यालयात सामाजिक उपक्रमामध्ये काम करणा-या व्यक्तीच्या अर्हताबद्दल संस्थेकडील अभिलेख पाहून
कार्यालय प्रमुखांना मतदार नोंदणीसाठी विहित नमुन्यात प्रमाणपत्र देता येईल. तसेच विद्यापीठांकडील पदवीधारकांची नोंदणी, अभियंत्यांची नोंदणी, विधी अभिकर्त्याची नोंदणी, वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी , सनदी लेखापालांची नोंदणी आदी नोंदणीबाबतचा दाखला अर्जासोबत
अर्हतेबाबत पुरावा म्हणून देता येईल. तसेच राजकीय पक्ष संघटना अथवा कोणत्याही व्यक्तीस एका गठ्ठा
अर्ज मिळणार नाहीत, तसेच एक गठ्ठा
पद्धतीने अर्ज स्वीकारलेही जाणार नाहीत. मात्र, एका कुटुंबासाठी अथवा कार्यालय प्रमुख अथवा संस्थेस
त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांसाठी अर्जाची एकत्रित मागणी करता येईल व एकत्रित अर्ज
सादर करता येतील.
प्राप्त
मतदारांची प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येऊन २३ नोव्हेंबर ते नऊ
डिसेंबरपर्यंत संबंधितांना दावे, हरकती नोंदविता येतील. दिनांक ३० डिसेंबर रोजी मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात
येणार आहे.यावेळी उपस्थित
उपजिल्हाधिकारी,तहसीलदार
यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
000000000000
No comments:
Post a Comment