Monday, August 31, 2020

 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ;

पूर परिस्थितीत नागरिकांनी काळजी घ्यावी  

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

 नांदेड (जिमाका) दि. 31 :- राज्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील लघू व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, पाझर तलाव, साठवण तलाव इ. काही पूर्ण क्षमतेने भरले तर काही भरण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पूर परिस्थिती उद्भवू शकते अशा गावांसाठी उपाययोजना करुन खबरदारी घ्यावी.  पावसाळ्यातील उद्भवणाऱ्या पूर आपत्तीपासून नागरीकांनी स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

पूर परिस्थितीत काय करावे

गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास अथवा पूराबाबत पूर्व कल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्त्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गावात अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. गावात व घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या. पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जातेवेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी ठेवावीत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जा. कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र न भिजता राहील याची काळजी घ्या. पूरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रमचा वापर करावा), एखादी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. पूर स्थितीत घाबरून जाऊ नका, शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा.

मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. 0262-235077 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना बांधले असेल तर त्यांना खुले करून सुरक्षित स्थळी हलवावे व स्वतः सुरक्षित स्थळाचा आसरा घ्यावा. सोबत रेडीओ, बॅटरी, मोबाईल इत्यादी संपर्काची साधने ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे साहित्य भिजणार नाही व सुरक्षित राहील याची योग्य खबरदारी घ्यावी.

पूर परिस्थितीत काय करु नये

पूर असलेल्या भागात, नदीच्या पूलावर विनाकारण भटकू नका. पूराच्या पाण्यात चुकूनही जावू नका. तसेच पूर ओसरल्यानंतर प्रशासनानाने परवानगी दिल्याशिवाय पूलावरुन गाडी घालण्याचा अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका. दूषित, उघड्यावरील अन्न व पाणी टाळा. (शक्यतो उकळलेले पाणी व सुरक्षित अन्न सेवन करा.) सुरक्षित ठिकाणी रहा व विद्युत तारांना स्पर्श करू नका. पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतू अपरीचीत व खोल पाण्यात जाऊ नका. जलसाठ्याजवळ, नदीजवळ जाऊ नये. आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. मच्छिमार व अन्य व्यक्तींनी पाण्यामध्ये जाऊ नये, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...