Thursday, October 20, 2022

 ई-श्रम पोर्टलवर असंघटित कामगारांना नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने असंघटीत कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस (NDUW) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने नांदेड येथील हाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात विविध कामगार संघटनेच्या प्रतिनीधीची बैठक घेण्यात आली. नांदेड जिल्हयातील जास्ती जास्त  संघटीत कामगारांची नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मो. अ.सय्यद यांनी केले आहे.

बैठकीला  विविध कामगार संघटनेचे प्रतीनिधी नागापुरकर, यादव आझादे, फारुख अहमद,ॲड श्रीधर कांबळे, विष्णु गोडबोले, अब्दुल वसीम, रमेश बरडे, बालाजी पवार, प्रभु नारायण उरडवड, मोहम्मद सोहेल, मोहम्मद इम्रान, खलिद हुसैन, आदित्य देशमुख, सय्यद मुनीर तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

असंघटीत क्षेत्रातील कामगार व्यक्तीचा समावेश पुढील प्रमाणे आहे. यात उसतोड कामगार, सुतारकाम करण्यारी व्यक्ती, बांधकाम कामगार, शेतीकाम करणारी व्यक्ती, घरकाम करणारी महिला, ऑटो चालक / रिक्षा चालक आशा सेविका व अंगणवाडी सेविका, न्हावी कामगार, वृत्तपत्र विक्रेते, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ब्युटीपार्लर कामगार महिला, फेरीवाले/भाजीवाले/फळवाले, पेंटर/इलेक्ट्रिशियन प्लंबर, रस्त्यावरील विक्रेते, पीठ गिरणी कामगार, पशुपालन करणार कामगार, लहान शेतकरी, वीटभट्टी कामगार, मनरेगा मजूर, माथाडी कामगार, चहा विक्रेते अशा असंघटीत क्षेत्रातील 300 कामगार व्यक्तींचा समावेश होतो.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्याचे फायदे

असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. नोंदणीकृत असंघटित कामगार प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागू राहील. ई-श्रम काढणाऱ्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्याच्या वारसदाराला  दोन लाख रूपयांचे  विम्याचे कवच देण्यात येईल. अपघातात  कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास  एक लाख रूपयांची  भरपाई केंद्र सरकार कडून मिळेल. प्रत्येक असंघटीत कामगाराला एक ओळखपत्र दिले जाईल. त्यावर एक युनिक ओळखपत्र क्रमांक असेल. हा डेटाबेस असंघटीत कामगारांसाठी धोरण आणि कार्यक्रमामध्ये सरकारला मदत करेल. स्थलांतरित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेणे आणि त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे आहे.

 

नोंदणी करिता पात्रता

असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याचे  वय 16 ते 59 दरम्यान असावे. कामगार आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. असंघटीत कामगार शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगातील असणे आवश्यक आहे.

 

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड , बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक अथवा आयएफएससी कोड असलेली इतर कोणतेही बँक), सक्रीय मोबाईल नंबर, स्वयं नोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे

 

नोंदणी कोठे करावी

स्वतः नागरी सुविधा केंद्र (सीएससी), कामगार सुविधा केंद्र , eshram portal url : eshram.gov.in या संकेतस्थळावर करावी. राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 14434, टोल फ्री नंबर 18001374150 हा आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील असंघटीत क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...