Monday, September 22, 2025

दि. 20 सप्टेंबर 2025

वृत्त क्रमांक 989

स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

शिबिरात ८५ महिलांची आरोग्य तपासणी

नांदेड दि. 20 सप्टेंबर : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिला पतंजली योग समिती, नांदेड यांच्या वतीने योग साधना शिबिरासोबत आरोग्य तपासणी शिबिर नुकतेच घेण्यात आले. श्री. गुरु गोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. राजाभाऊ बुट्टे, एनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, आरएमओ डॉ. पुष्पा गायकवाड व डॉ. एच.के. साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात एकूण ८५ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिलांचे उच्चरक्तदाब, मधुमेह तपासणीसह विविध रक्त तपासण्या (CBC, LFT, KFT, HBA1C) घेण्यात आल्या.

या उपक्रमासाठी पतंजली योग समिती नांदेडच्या प्रांत संवाद महिला प्रभारी उर्मिला साजने, डॉ. दिपक हजारी, डॉ. वैजवाडे, विजय उदगीरकर, जगन्नाथ अमिलकंठ्वार, विठ्ठल कदम, हनुमंत ढगे, सौ. सुरेखा चिद्रावर यांची उपस्थिती लाभली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. विखारुनिसा खान, शिल्पा सोनाळे, रूपा गजभारे, सुवर्णकार सदाशिव व सुरज वाघमारे यांच्या वैद्यकीय टीमने विशेष परिश्रम घेतले.

संपूर्ण शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियान अधिक परिणामकारक ठरले.

०००००



No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...