वृत्त क्रमांक 284
शेतकऱ्यांनी प्राधान्याने ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 मार्च :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब योजनेअंतर्गत शासकीय अनुदानित अन्न धान्याचा लाभ सुरु ठेवण्यासाठी कुटूंबातील रेशनकार्डमध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील रास्तभाव दुकानदारांशी संपर्क करुन तात्काळ ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.
ई-केवायसी करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानात समक्ष उपस्थित राहून ई-पॉश मशिनवर बायोमॅट्रीक ऑथेंटिकेशन पूर्ण करावे, किंवा राज्य सरकारने एनआयसीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा ई केवायसी ॲप मोबाईलमध्ये सुरु केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या मोबाईलद्वारे ई-केवायसी पूर्ण करता येईल.
ई-केवायसी पूर्ण न केल्याने अन्नधान्याचा लाभ बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत लाभार्थ्यांची राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने केले आहे.
ई-केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे-
कुटूंबातील सर्व लाभार्थ्यांचे मुळ आधार कार्ड, झेरॉक्स प्रती, रेशनकार्ड इ.
एपीएल शेतकरी डीबीटी- राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्य ऐवजी प्रतिमहा प्रति लाभार्थी 150 व 170 इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतरणाची डीबीटी द्वारे योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने एपीएल शेतकरी लाभार्थ्यांनी रास्तभाव दुकानदार यांचेकडे सादर करावयाचे कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत, राशनकार्ड झेरॉक्स प्रत, महिलांच्या नावाची पासबुक झेरॉक्स प्रत, सातबारा झेरॉक्स प्रत इ.
ॲग्रीस्टॅक-
केंद्र व राज्य सरकारने शेतीच्या लाभार्थ्यांस प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक कृषी क्षेत्रात डिजीटल सेवाचा वापर करुन शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकरी आोळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रीया सुरु आहे. पीएम किसान, सन्मान योजना, नैसर्गिक आपत्ती, मृदा परीक्षण, खत सक्ती आधुनिक शेतीसाठी मदत हवामान अंदाज, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिंबक सिंचन इत्यादी फायदे ॲग्रीस्टॅक कार्डमुळे शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावामधील सीएससी, सेतु धारक यांच्याकडे जाऊन अथवा कॅम्पमध्ये ॲग्रीस्टॅक मध्ये नाव नोंदणी करुन घ्यावी.
आयुष्यमान भारत-
आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. आधार कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स प्रत, मोबाईल इ.
नागरिकांनी सीएसी, सेतु सुविधा धारक यांना संपर्क करावा, सध्या गावो-गाव कॅम्प चालू आहेत. नागरिकांनी या कॅम्पच्या ठिकाणी उपस्थित राहून रेशनकार्ड ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक व आयुष्यमान कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment