Wednesday, August 4, 2021

 महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतील 

पात्र शेतकऱ्यांनी त्वरीत आधार प्रमाणिकरण करावे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांपैकी अजूनही 6 हजार 480 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाहीत. यामुळे त्यांना या योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी तात्काळ नजिकच्या सेवा केंद्राला भेट देऊन प्राधान्याने हे काम करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसिलदारांनी संबंधित बँक, उपनिबंधक यांच्याशी संपर्क साधून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक अनिल चव्हाण व जिल्ह्यातील सर्व संबंधित बँक अधिकारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात 2 लाख 9 हजार 99 पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. यातील 1 लाख 87 हजार 521 शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण केले असून उर्वरीत 6 हजार 480 शेतकऱ्यांनी अद्यापही आपले आधार प्रमाणिकरण केले नाही.  

बँकांनीही अधिकाधिक सकारात्मक दृष्टिकोण घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. आजही जे पात्र शेतकरी आहेत त्यांना कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी व निवेदन आमच्या कार्यालयाला प्राप्त होतात. संबंधित बँक अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वेळेवर न दिल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, उपनिबंधक यांनी सहभाग घेतला. 

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...