Thursday, March 21, 2024

वृत्त क्र. 264

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा

 

·       पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद

·       भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 

नांदेड, दि. २१ : नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान व डोळे होऊ शकते. अशा पद्धतीचे उल्लंघन झाल्याबाबतची तक्रार करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाने करून दिली असून त्यासाठी सी-व्हिजिल ॲपवर आपली तक्रार घरबसल्या नोंदल्या जावू शकते. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

 

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. हे ॲप कुठल्याही लोकसभा मतदारसंघासाठी वापरता येऊ शकते.

 

 आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

 

 हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

 

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

 

वापर कसा करायचा

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

 

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

 

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

 

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

 

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

000000




No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...