Friday, May 15, 2026

वृत्त क्रमांक 

नांदेड तालुक्यात जनगणना 2027 च्या प्रत्यक्ष कामास आजपासून प्रारंभ

प्रगणक व पर्यवेक्षकांचे अंतिम प्रशिक्षण उत्साहात संपन्न

नांदेड दि. 15 मे :- भारतीय जनगणना 2027 अंतर्गत घर यादी व घर गणना अभियानाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय, नांदेड अंतर्गत सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांचे अंतिम प्रशिक्षण शंकराव चव्हाण सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील प्रत्यक्ष जनगणना कार्यास उद्यापासून सुरुवात होत असून प्रशासनाने त्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे.

या प्रशिक्षणामध्ये जनगणनेदरम्यान आवश्यक असणाऱ्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः “मांडणी दर्शक नकाशा” अचूक पद्धतीने कसा तयार करावा, गावातील प्रत्येक घराची नोंद कशी करावी, तसेच घरांची क्रमवारी व भौगोलिक मांडणी कशी ठेवावी याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. याशिवाय केंद्र शासनाच्या “HLO App” चा वापर करून डिजिटल पद्धतीने माहिती नोंदविणे, माहिती अपलोड करणे, स्वगणना आयडी तपासणे आणि ऑनलाइन प्रक्रियेमधील अडचणी सोडविणे याबाबतही सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी प्रमुख उपस्थिती लावून सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले. त्यांनी जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असल्याचे सांगत प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने, अचूकता व पारदर्शकतेने काम करण्याचे आवाहन केले. शासनाच्या विविध योजना, विकास आराखडे आणि संसाधनांचे नियोजन हे जनगणनेतील माहितीवर आधारित असते, त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पोहोचून योग्य माहिती संकलित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी स्वगणना प्रक्रियेत शंभर टक्के यश संपादन करणाऱ्या वाडी करडेल व गुंडेगाव येथील प्रगणक व पर्यवेक्षकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. स्वगणना पूर्ण झाल्यामुळे प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र स्वगणना आयडी प्राप्त झाला असून त्यामुळे प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. तसेच निवासी नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थींनी जनगणना कार्य यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नांदेड तालुक्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून सुरू होणाऱ्या या जनगणना मोहिमेमुळे प्रशासनाला अचूक लोकसंख्यात्मक माहिती उपलब्ध होणार असून विकास योजनांना अधिक गती मिळणार आहे.

00000





No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   आपले सरकार सेवा केंद्रासाठी नांदेडमध्ये पारदर्शक मुलाखती आठ तालुक्यांच्या मुलाखती शुक्रवारी पडल्या पार, शनिवारी उर्वरित आठ त...