Thursday, October 20, 2016

शहीद पोलिसांना मानवंदना

आपले कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी संपूर्ण भारतभर 21 ऑक्टोबर हा दिवसपोलीस स्मृतीदिनम्हणून पाळला जातो. आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस दलातील 231 अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांना ही मानवंदना

देशाबाहेरील शत्रुंपासून राष्ट्राचे, राष्ट्रातील नागरिक, त्यांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संरक्षण दलाच्या लष्कर, वायु सेना आणि नौदलातर्फे अहोरात्र पार पाडण्यात येत असते. तर देशांतर्गत शत्रूपासून, समाजविघातक कंटकांपासून नागरिकांच्या जीविताचे, मालमत्तेचे, कायदा सुव्यवस्था पाळण्याचे कर्तव्य संबंधित राज्याच्या पोलीस दलांकडून करण्यात येते.
आपले कर्तव्य बजावताना काही वेळा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वीरमरणदेखील पत्करावे लागते. अशाप्रकारे कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करलेले   पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरपोलीस स्मृतिदिनम्हणून पाळला जातो. त्याशिवाय भारतातील सर्व पोलीस दलांकडून कवायतींचे आयोजन करून 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली जाते.
21
ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळण्याचे कारण म्हणजे 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाखमधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादित निर्जन अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलीस दलातील 10 जवान गस्तीवर असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला कडवे आव्हान देत त्या 10 जवानांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आणि ते वीरगतीला प्राप्त झाले. त्या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दु:खाची छाया पसरली होती. या वीर पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना अतिशय उच्च कोटीचे शौर्य दाखवले होते. त्यांनी दाखविलेल्या त्या शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची राष्ट्रनिष्ठेची जाण प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी, म्हणून शहीद पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरपोलीस स्मृतिदिनया नावाने पाळला जातो.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी हे देखील वेळप्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावून नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे संरक्षण करण्यात तसूभरही कमी नाहीत. मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर,2008 रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेले सहपोलीस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर, पोलीस निरीक्षक बापूराव धुरगूडे, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भोसले, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे, वाहनचालक अरुण चित्ते, पोलीस कॉन्स्टेबल सर्वश्री विजय खांडेकर, जयवंत पाटील, अंबादास पवार, योगेश पाटील आदींची शौर्यगाथा तर आपल्या मनावर कायमची कोरली गेली आहे.आपल्यासाठी शहीद झालेल्या या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कृतज्ञतापूर्ण मानवंदना.

-
देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती) (वृत्त).
Bottom of Form


No comments:

Post a Comment

​   वृत्त क्र. 1138 ​ वेगळी निवडणूक ! यंत्रणेवर विश्वास वाढविणाऱ्या घटनांनी लक्षवेधी ठरली   25 वर्षानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी नांद...