विशेष वृत्त
मराठवाडा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या
नागोजी नाईक यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण
· श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेच्या पालखीचा बहुमान अनेक पिढ्यांपासून नाईक घराण्याकडे
· जिल्हा परिषदेच्यावतीने विविध विभागाचे स्टॉल्स
· पशुधनासाठी यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकिय सुविधा
नांदेड (जिमाका) दि. 21 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील खंडोबाच्या पालखीला नाईक घराण्याचा मान हा अनेक पिढ्यांपासूनचा आहे. माळेगाव पासून 20 कि.मी. अंतरावर असलेल्या रिसनगावचे हे नाईक कुटुंब. या घराण्यातील नागोजी नाईक यांनी सन 1809 च्या अगोदर निझामशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी बंड पुकारले. त्यांना पकडून कंधार येथे निझामाने तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने नाईक घराण्याने दिलेल्या बलिदानाचे संपूर्ण नांदेड जिल्हा कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत आहे.
खंडोबा हे महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेचे दैवत आहे. माळेगाव हे खंडोबाचे पवित्र स्थान म्हणून गणल्या गेले आहे. खंडोबाच्या मंदिराचे काम 17 व्या शतकात झाले असावे. मंदिर व यात्रेची व्यवस्था निजाम राजवटीत कंधार परगण्याचे राजे गोपालसिंघ कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद यांच्याकडे असल्याचा उल्लेख आहे. मुळात 13 व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिराच्या अधिष्ठानावर नंतरच्या काळात हे मंदिर उभारण्यात आले.
दरवर्षी माळेगावची यात्रा खंडोबाचा उत्सव म्हणून मार्गशीष मधील एकादशीला सुरु होते. येथील गुरांचा बाजार, विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जात पंचायती हे या यात्रेचे अलिकडच्या चार दशकात वैशिष्ट्ये म्हणून नावारुपास आले आहे. या यात्रेला सुमारे 300 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असल्याने येथील विविध शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाटक असा समृद्ध मराठी लोककला संस्कृतीचा अविष्कार पाहायला मिळतो. यावर्षी गायवर्गात आढळणाऱ्या लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. याचबरोबर माळेगावसह अन्य कुठेही गो वर्गीय पशुधनाच्या प्रदर्शन, मेळावे, खरेदी-विक्री, वाहतूक यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तथापि इतर आश्व, श्वान, कुक्कुट व शेळीगट यांच्या स्पर्धा घेण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केले आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने याठिकाणी लोककल्याणकारी योजनांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने कृषि विभाग, पशुसंवर्धन, समाज कल्याण व इतर विभागांचा समावेश आहे. या यात्रेत आश्व, श्वान, कुक्कुट व इतर प्राण्यांची संख्या लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यात्रा कालावधीत 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभाग सतर्क ठेवण्यात आला आहे. माळेगाव येथील खंडोबा यात्रेतील पालखी मिरवणूक व इतर कार्यक्रमास कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व शांतता रहावी म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये 20 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्रीपासून ते 28 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात व माळाकोळीचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 मधील पोट कलम अ ते फ प्रमाणे अधिकार प्रदान केले आहेत.
0000
No comments:
Post a Comment