Wednesday, October 14, 2026

वृत्त क्रमांक

वृक्षांच्या सावलीत ज्ञानाची पेरणी; मारतळा शाळेचे ‘वृक्ष वाचनालय’ ठरतेय प्रेरणादायी

• वाचन प्रेरणा दिनानिमित्त अभिनव उपक्रमाची चर्चा

• निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृतीची जोपासना

नांदेड (जिमाका), दि. 14 : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अवांतर वाचनाची गोडी लागावी आणि पर्यावरणप्रेमाची भावना रुजावी, या उद्देशाने लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मारतळा येथे सुरू करण्यात आलेले ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय’ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मार्च 2023 पासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमातून शाळेने विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. 

थोर शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांपासून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या या वाचनालयात विद्यार्थी शाळेच्या परिसरातील वृक्षांच्या सावलीत बसून गोष्टी, चरित्रे आणि प्रेरणादायी पुस्तके वाचतात. दर शनिवारी एक तास वाचनासाठी राखून ठेवण्यात येतो.

निसर्गाच्या सान्निध्यात वाचनाचा आनंद घेताना विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये, शब्दसंग्रह, कल्पनाशक्ती आणि चिंतनक्षमता विकसित होण्यास मदत होत आहे. वाचलेल्या साहित्याचे आकलन करून ते स्वतःच्या शब्दांत व्यक्त करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. स्वतंत्र इमारतीऐवजी वृक्षांची सावली हेच या वाचनालयाचे ज्ञानमंदिर बनले असून, शिक्षण आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला जात आहे.

‘वाचणारा विद्यार्थी, विचार करणारा नागरिक आणि ज्ञानसमृद्ध समाज हे आमचे ध्येय आहे,’ असे मुख्याध्यापक रवी ढगे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना पुस्तकांशी मैत्री करता यावी, त्यांच्यात स्व-अध्ययनाची सवय निर्माण व्हावी आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वाचनालयामुळे वाचनाची आवड निर्माण झाली असून, दररोज काहीतरी नवीन शिकण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी आकांक्षा शाहूजी येडे हिने व्यक्त केली. वृक्षांच्या सावलीत पुस्तकांशी मैत्री घडविणारा मारतळा शाळेचा हा उपक्रम वाचनसंस्कृतीच्या जोपासनेसह निसर्गप्रेमाची शिकवण देणारा ठरत आहे.

***








No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे संरक्षण करा उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून झाडांवरील ताण कमी करण्याचे आवाहन नांदेड(जिमाका),...