वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘येलो अलर्ट’
वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ;
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. २१ : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २१ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
२१, २२ व २४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट यांसह मुसळधार पाऊस होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुन्हे यांनी केले आहे.
विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी
विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास जवळच्या सुरक्षित इमारतीचा आश्रय घ्यावा. सुरक्षित इमारत उपलब्ध नसल्यास सखल जागी जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये.
घरातील विद्युत उपकरणे बंद करून शक्य असल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करावा. तारांचे कुंपण, विद्युत खांब तसेच इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. पाण्यात असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी बाहेर पडावे.
या गोष्टी टाळाव्यात
विजा चमकत असताना लँडलाईन फोनचा वापर, शॉवरखाली अंघोळ करणे, नळ अथवा पाण्याच्या पाइपलाइनला स्पर्श करणे तसेच विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना लोखंडी सांगाड्याच्या तंबूत किंवा शेडमध्ये आश्रय घेऊ नये.
उंच झाडांच्या खाली थांबू नये. धातूच्या उंच मनोऱ्यांजवळ उभे राहू नये. घरात असताना उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये. या काळात नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून सुरक्षित ठिकाणी राहावे, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment