Monday, August 15, 2016


गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरुपांना प्रतिबंधासाठी
वैज्ञानिक क्षमताचाही पुरेपूर वापर व्हावा - राज्यमंत्री खोतकर
नांदेड पोलिस दलाच्या सायबर लॅब, आय-कार,
टुरीस्ट पोलीस उपक्रमांचे उद्घाटन संपन्न

नांदेड, दि. 15 :- गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरुपानुसार त्याला  प्रतिबंध  करण्यासाठी वैज्ञानिक क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल. त्यादृष्टीने नांदेड पोलीस दल सक्षम होत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे काढले. नांदेड पोलिस दलाच्या सायबर लॅबचे उद्घाटन राज्यमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले. निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर  महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, उपमहापौर शफी कुरेशी, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय ऐनपुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री खोतकर पुढे म्हणाले की, जग वेगाने बदलते आहे. तंत्रज्ज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे गुन्ह्यांच्या प्रकारात, स्वरुपातही बदल होत आहेत. त्यादृष्टीने राज्यात माहिती तंत्रज्ज्ञान क्षेत्रातील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर लॅबची संकल्पना मांडली. या लॅबचे राज्यात एकाचवेळी उद्घाटन करण्यात येत आहे. बदलत्या जगात गुन्हेगारीचे प्रकारही बदलले आहेत. त्यामुळे पोलीस दलही बदलले पाहिजे. या गुन्ह्यांचा तपास प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या लॅबचा निश्चित वापर होणार आहे. ज्यामुळे गुन्ह्यांतील शिक्षेच प्रमाण वाढेल आणि गैरप्रकारांना जरब बसेल. नव समाज माध्यमांवर शांतता-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी नजर ठेवणे आवश्यक ठरू लागले आहे. त्यादृष्टीनेही या सायबर लॅब उपयुक्त ठरतील. पोलिस दलांला अद्ययावत ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ज्ञान उपलब्ध करून देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुरवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक ऐनपुरे यांनी प्रास्ताविकात सायबर लॅब, तसेच आय-कार आणि टूरीस्ट पोलीस व्हॅन या संकल्पनांबाबत माहिती दिली. श्री. देवराय यांनी सुत्रसंचालन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर राज्यमंत्री खोतकर यांनी पोलीस मुख्यालयातील सेफ सिटी-प्रोजेक्ट या वैशिष्ट्यपुर्ण प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणीद्वारे माहिती घेतली. हा प्रकल्प आणखी सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
फिरते न्यायवैधक तपास वाहन (फोरेन्सीक इन्व्हिस्टीगेशन कार) आय-कारचे उद्गघाटन
नांदेड जिल्हा पोलीस दलाकडे अत्याधुनिक अशी फिरते न्यायवैधक तपास वाहन मिळाले आहे. या वाहनाचे आय-कारचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वाहनात न्यायवैधक पुरावे गोळा करण्यासाठीच्या तेरा उपकरणांचे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जेणेकरून घटनास्थळी पोहचून, शास्त्रोक्त आणि अचूक पद्धतीने न्यायवैधक पुरावे गोळा करता येणार आहेत. ज्यांचा वापर गुन्ह्यांच्या तपासात आणि दोषारोपपत्र प्रभावी करण्यासाठी करता येणार आहे. यामुळे गुन्हा शाबित करण्यात व त्याद्वारे शिक्षेचे प्रमाणही वाढणार आहे. नांदेड शहरात धार्मिक पर्यटक, तसेच विदेशी पर्यटकांचीही संख्या मोठी असते, या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, मदतीसाठी आणि प्रसंगी आपत्कालिन परिस्थितीवर मात करण्यासाठी टूरिस्ट पोलीस व्हॅन सूसज्ज करण्यात आली आहे. या व्हॅनचेही राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांसाठी पोलीस मुख्यालयातीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...