Thursday, January 14, 2021

 

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील

कामगार / कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी  

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्याक्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी  सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बाजवण्यासाठी सुट्टी / 2 तासाची सवलत देण्यात यावी. कर्मचाऱ्याच्या वेतनातून वेतन कपात केल्यास ते जिल्ह्यातील जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदवू शकतात. खाजगी क्षेत्रातील आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अ. सय्यद यांनी केले. 

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशाद्वारे व शासन परिपत्रकातील परिशिष्ट १ व परिशिष्ट २ नुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकासाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरीत सर्व जिल्ह्यात शुक्रवार दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम समाविष्ट आहे. शासनाने या मतदानासाठी भरपगारी सुट्टी कामगारांसाठी जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व खाजगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने, मॉल्स व्यापारी संकुल इत्यादी ठिकाणी काम करणारे अधिकारी, कर्मचारी, कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपागारी सुट्टी द्यावी व त्यांच्या वेतानातून वेतन कपात करण्यात येवू नये तसेच सवलतीस पात्र असलेल्या आस्थापनांना ही सवलत देणे बंधनकारक आहे. 

राज्य शासनाच्या १३ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी मग ते कामानिमित्त निवडणुक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, ओद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी) तसेच अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीतकमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांना संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासाची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील, असे निर्देश दिले आहेत.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...