वृत्त क्रमांक 252
स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घ्या : गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन
१७ जिल्हयातील मागासवर्गीयांच्या वसतीगृहांची पाहणी
नांदेड दि.३ मार्च : स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घेणे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील वसतीगृहांमध्ये सुधारणेस वाव असून विद्यादानाच्या या कामांमध्ये संवेदनशीलता ठेवून काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज येथे केले.
सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गोरक्ष लोखंडे यांनी आयोगाचे सदस्य म्हणून आत्तापर्यंत 17 जिल्ह्यांना भेट दिली आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहात शिकूनच आम्ही देखील मोठे झालो आहे.त्यामुळे या वसतीगृहाची माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात वाढ होण्यात काय महत्त्व असते, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागासवर्गीय वसतीगृहाच्या संदर्भात अतिशय संवेदनशील धोरण ठरवले असून विद्यार्थ्यांच्या तासिका, त्यांच्या शिकवण्या, त्यांचे प्रशिक्षण सर्व लक्षात घेऊन भोजन व निवाऱ्याची सुविधा संवेदनशीलतेने पुरवावी, असे आवाहन त्यांनी केले.
समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक वसतीगृहांची त्यांनी गेल्या दोन दिवसात पाहणी केली. यावेळी त्यांनी मुदखेड येथील वसतीगृहातील सुविधा व शिस्तीचे कौतुक केले. महाराष्ट्राला मोठमोठे अधिकारी या वसतीगृहाने दिले आहे. त्यामुळे वंचित समाजाने आपली मुले वसतीगृहात मोठ्या संख्येने दाखल होतील यासाठी प्रवेश प्रक्रिया व अन्य बाबी समजून घ्याव्यात, तसेच समाज कल्याण विभागाने या प्रक्रिया अतिशय सोप्या व सर्वांना माहिती होईल, या पद्धतीने प्रचार प्रसिद्धी करावी असे आवाहनही त्यांनी केले.
संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून या काळामध्ये आयोजित कार्यक्रमातून सोप्या शब्दात संविधान जनतेला माहिती होईल. तसेच या संदर्भातील अफवा पसरणार नाही. त्याला कोणी बळी पडणार नाही, यासाठीचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.
परस्परांच्या जात,धर्म व परंपरांचा सन्मान करताना मनातली भावना देखील स्वच्छ असली पाहिजे. कुणाच्या जाती बद्दल, कुणाच्या प्रगती बद्दल, असूया असू नये. द्वेष असू नये. ही परिस्थिती समाजात निर्माण झाल्यानंतर ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्येही कमी येईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या तीन दिवसांपासून ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या काळात त्यांनी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र अहुलवार, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मीनगिरे आदींशी चर्चा करून जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी विविध सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये ही सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment