Monday, March 3, 2025

दि. 1 मार्च 2025

वृत्त क्रमांक 247

ग्रंथ जीवनावर प्रभाव पाडणारे मोलाचे साधन -  माजी खासदार डॉ व्यंकटेश काब्दे 

 दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवाचा समारोप 

नांदेड दि.01 मार्च2025 -ग्रंथ वाचनामुळे मनुष्याचा सर्वा‍गिण विकास होतो.  जीवनावर प्रभाव पाडणारे उत्कृष्ट साधन म्हणजे ग्रंथ आहेत. यासाठी  सर्वांनी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी केले. 

ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने बहुउद्देशिय सांस्कृतिक संकुल, श्री.गुरुगोबिंदसिंगजी स्टेडीयम परिसर, नांदेड येथे दोन दिवसीय नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप डॉ. काब्दे यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

या समारोपास माजी आमदार तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ॲड गंगाधर पटने, निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वडगांवकर, निवृत्त  जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ.काब्दे पुढे म्हणाले की, आपणास माता पिता जन्म देतात जीवन घडवितात ते शिक्षक व ग्रंथ यांनीच माझे जीवन घडवीले आहे.बालपणापासूनच इयत्ता तिसरी चौथीत असल्यापासून मी छोटे वाचनालय चालवायचो. मान्यवरांच्या लेखांचे टिपण काढून ते संकलित करायचो. साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांचे  मार्गदर्शन घ्यायचो. वाचक चळवळ ही मोलाची आहे पुस्तकापेक्षा मोबाईलचे आकर्षण सध्या जास्त्‍ आहे. पुस्तकामध्ये सर्व काही अर्थपूर्ण असते. म्हणून ग्रंथालय चळवळ महत्वाची आहे. वाचनालयात युवकांना वाचनाची आवड वाढवा.मोबाईलसुध्दा हितकारक असून मोजके जे पाहिजे ते मुलांना बघु द्या असे त्यांनी सांगितले.  

यावेळी माजी आ.ॲड.गंगाधर पटने म्हणाले की,व्यस्त जीवनशैली असतानाही सर्वजण ग्रंथालय चळवळ समृध्द करणारेंचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी एक कविता सादर केली. 

निर्मलकुमार सुर्यवंशी म्हणाले आपण सर्वांनी ज्ञानदानाचे व्रत घेतले आहे.ग्रंथाचा प्रचार प्रसार करा वाचनाची‍ गोडी लावा.ग्रंथालय चळवळीची ज्योत विझू देवू नका. आपण  या चळवळीचे खरे शिल्पकार आहोत. ग्रंथालय हे ज्ञानाचे व महापुरुष घडविणारे मंदिर आहे . ग्रंथालय चळवळीची ही पालखी आपल्या खाद्यांवर आहे यासाठी सर्वांनी वाचनसंस्कृती समृध्द करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ.काब्दे यांच्या हस्ते ग्रंथालय चळवळीस मोलाचे सहकार्य करणारे उत्कृष्ट ग्रंथपाल,तालुका ग्रंथालयाचे प्रतिनिधी कर्मचारी माधवराव जाधव,गोविंद  फाजगे,भगवान बनसोड,शिल्पा पाठक,कैलाशचंद्र गायकवाड, संजय पाटील,अजय  वट्टमवार, उत्तम घोरपडे, कुमार देशमुख ,चंपतराव डाकोरे आदींचा यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. 

प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी,कैलाशचंद्र गायकवाड,अजय वट्टमवार,संजय पाटील आदीनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन बालाजी नार्लेवाड यांनी केले. या समारंभास जिल्हयातील वाचनालयातील पदाधिकारी व ग्रंथपाल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी केले.

0000





No comments:

Post a Comment

  ‘जीडीसीए’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली अकोला, दि. ३ : जी. डी. सी. अँड ए आणि सीएचएम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि. ७ मा...