Friday, September 9, 2022

 जनावरांचे गोठे व जनावरे यांची फवारणी

करुन घेण्याचा पशुपालक व शेतकऱ्यांना सल्ला 


नांदेड जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव नाही

जिल्हा पशुसंवर्धन विभाग दक्ष 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्यात सद्यस्थितीत काही जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे विशेष दक्षता घेण्यात आली असून ग्रामपातळी पर्यंत पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनाची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. या आजाराला रोखण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार गोठा व जनावरांवर औषधांची फवारणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी केले आहे. 

सन 2020-21 मध्ये लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये झाला होता. जिल्हयातील एकूण 45 हजार जनावरे बाधीत झाली होती.  1 लाख 20 हजार गोट पॉक्स लस मात्रा खरेदी करुन पशुधनास लसीकरण करण्यात आले होते.  सन 2022-23 साठी राज्यस्तरावरुन 10 हजार लस मात्रा खरेदी करुन संस्थाना रोग प्रादुर्भाव उदभवल्यास प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी वाटप करण्यात आलेले आहे. पशुपालकामध्ये जनजागृतीचे कार्य पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. पशुपालक व ग्रामपंचायतच्या मदतीने जनावरांच्या गोठयामध्ये फवारणी करणेसाठी किटकनाशक औषधाचा पुरवठा करुन गोठे फवारणीचे काम चालु असल्याची माहिती डॉ. रत्नपारखी  यांनी दिली. 

पशुपालकामध्ये या आजाराविषयी जनजागृती होण्यासाठी नांदेड एफ एम रेडीओवरुन किसानवाणी या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मागदर्शनपर मुलाखत सादर करण्यात आली. जिल्हा आणि तालुकास्तरावर माहीतीपर घडीपत्रीका वितरीत करण्यात येत आहेत. पशुवैदयकिय संस्था  पातळीवर या रोगाविषयी माहीती होण्यासाठी बॅनर तयार करुन लावण्यात आले आहे. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात 16 तालुक्यात शिघ्र कृती दल स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्हयात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -1 – 74, श्रेणी -2 – 104   राज्यस्तरीय संस्था- 6 असे एकूण -184 पशुवैदयकिय संस्था कार्यरत आहेत. मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजनेचे तीन फिरते पशुचिकित्सा पथके कार्यान्वित आहेत.  सर्व संस्था प्रमुखांना या रोगाविषयी सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. बाधीत जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत व तात्काळ उपचार सुरु करावा.  गोचिड, गोमाशा व डास निर्मुलन मोहिम सुरु करावी असेही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...