Monday, July 28, 2025

वृत्त क्र. 775

शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे –जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी 

नांदेड दि. 28 जुलै :- हुमणी अळी (होलोट्रीचीया प्रजाती) ही एक बहुभक्षी कीड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे नुकसान होते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हुमणी अळी या बहुभक्षीय किडींचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळच्या वेळी शेतातील कडुलिंब, बोर आणि बाभुळ या झाडांचे निरीक्षण करावे. त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापळे लावावे. एक मादी भुंगा नष्ट झाल्यास त्यापासुन तयार होणाऱ्या ४० ते ५० अळयांचा नाश होतो. सातत्याने हि किड येणाऱ्या भागात बाभुळ, कडूनिंब आणि बोर हयासारख्या झाडावर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. भुंग्यांची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी २० अगर त्यापेक्षा जास्त असेल तर नियंत्रणाची मोहीम राबवावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर ३ आठवडयांनी करावी. 

हुमणी अळीची प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. हया किडींची अळी अवस्था नुकसान कारक असून ती विविध पिकांच्या मुळावर आपली उपजीवीका करते. उदा. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापूस आणि सुर्यफुल ई. पिकाची मुळे खाल्यामुळे पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात. 

या किडीचे जीवनचक्र एक वर्षाचे असून ती आपली उपजीविका जमिनीमधे करते. हि किड अळी अवस्थेत 6 ते 8 महिण्याची असून या अवस्थेत खरीप व रब्बी पिकांची मुळे खाऊन पिकाचे नुकसान करते. एक मादी दररोज एक अंडी घालते. एक मादी मे ते जुलै महिन्यात पोषक वातावरणानुसार 40 ते 50 अंडी घालते. अंडी 3 ते 5 दिवसात उबवून त्यातून बारीक पिवळसर अळया निघतात. त्या अळ्या गवताच्या कुंजलेल्या मुळ्या खाऊन जगतात. पूर्ण वाढ झालेली अळी 3 त 5 सेंमी रुंद, मांसळ पांढुरकी अथवा मळकट पणुढ-या रंगाची "C" आकाराची असते. 

शेतात निरिक्षण घेतेवेळी एकरी 20 ठिकाणचे मातीचे नमुने (1 फुट x 1 फुट x 6 इंच खोल) घेवून त्यात हुमनी अळया आहेत का ? ते शोधावे, तसेच पिकामधे विशिष्ट ओळीमधे प्रादूर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून सुकतात. अशी झाडे आढळल्यास ती मुळासकट उपटुन मुळे कुरतडलेली आहेत का? हे पहावे.

सौम्य प्रादुर्भाव तुरकळ ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकांच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. मित्र बुरशीचा वापर करतांना ओलावा असणे आवशक असते.

लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरीता खालील पैकी एका रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. फिप्रोनिल 40 टक्के + इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के दाणेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे. किंवा कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार ३३.३० किलो किंवा थायोमेथोक्झाम 0.4 टक्के + बायफेनथ्रिन 0.8 टक्के दानेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम 0.9 टक्के फिप्रोनिल 2 टक्के दानेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून दयावे.

00000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...