Friday, November 24, 2017

दयाळा एवढे द्यावे, रंग फुलाचे जावे
-प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
                                                     नांदेड ग्रंथोत्सवामध्ये रंगली काव्यमैफल
           
नांदेड दि. 24 :- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव-2017 मध्ये सुप्रसिध्द ज्येष्ठ कवी प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक नामवंत कवींनी आपल्या कविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
            किनवट येथील . मार्तंड कुलकर्णी यांनी प्रारंभी सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील पोवाडा गाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सिंधुताईचे जीवनपट या पोवडयातून उलगडून दाखविला. भगवान अंजनीकर यांनी "दबलेला" आवाज, मनोज बोरगांवकर यांनी सादर केलेले "आत्महत्येपूर्वीचे स्वगत" रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन गेले. पूजा डकरे यांनी " क्षणक्षण आयुष्य " या कविताव्दारे आयुष्यात घडणाऱ्या घटनांची मांडणी केली. अशोक कुबडे यांनी "पत्र शेवटचे लिहीते आई" ही कविता तसेच अनिकेत कुलकर्णी या त्यांच्या सुरेल स्वरात गायीलेली गजल दाद मिळवून गेली. प्रा. रविचंद्र हडसनकर यांची "एक कविता गावाकडची" सर्वांना गावाकडील निखळ वातावरणात घेऊन गेली. महेश मोरे यांची "डिजीटल व्हिलेज ", देविदास फुलारी यांची "आम्ही आहोत ऑनलाईन" ही सुखद हास्य फुलवून गेली.
            काव्यमैफलीचे सूत्रसंचालक बापू दासरी  यांची "बापू म्हणे कचरा गेला" ही गजल तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी "अस्पर्शित ग्रंथाची व्यथा" ही कविता सादर केली.
            शेवटी काव्यमैफलीचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांनी "कधीही नष्ट होणारी जात ", "पुतळयाचे मनोगत" "दयाळा" या कवितेतून "दयाळा एवढे दान द्यावे, रंग फुलाचे जावे" ही कविता सादर करुन काव्यमैफलीचा अविस्मरणीय समारोप केला.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...