Friday, March 27, 2020


अत्यावश्यक सेवांच्या वाहतूकीस बंदी नाही  
-          जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 
नांदेड,दि. 27: शासनाच्‍या अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहूतकीस बंदी नाही, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात ट्रान्‍सपोर्टर्सच्‍या बैठकीत आज ते बोलत होते.  
यावेळी ट्रान्‍सपोट्रर्सचे जिल्‍हाध्‍यक्ष जाहेद भाई, जिल्‍हा मालक असोसिएशनचे अध्‍यक्ष सुखासिंग हुंडा, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्‍पर जिल्‍हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाचे राहूल जाधव, जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक आदींची उपस्थिती होती.
डॉ. विपीन म्‍हणाले, अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहतूकीच्‍या अनुषंगाने वाहनांसाठी पासेस उपलब्‍ध करून देण्‍यासाठी, जिल्‍हाधिकारी कार्यालयातील कक्षात महसूल, पोलीस‍ विभाग, परिवहन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
अत्‍यावश्‍यक सुविधेसाठी पासेस‍ मिळण्‍याबाबत मागणी प्राप्‍त होताच पासेस निर्गमित करण्‍यात येतील. पासेसची प्रत वाहनाच्‍या समोरील भागात काचेच्‍या मधल्‍या बाजूने लावणे बंधनकारक राहील.
तालुक्‍याच्‍या ठिकाणी महसूल व पोलीस विभाग यांचे नियंत्रण कक्ष उघडण्‍यात येत आहे. त्‍यांच्‍याकडून अर्ज आल्‍यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ई-मेलद्वारे कार्यालयाची मान्‍यता आल्‍यानंतर परवाना निर्गमित करावा. वाहतूकदारांनी collectoroffice09@gmail.com या ईमेलवर मागणी करावी. अत्‍यावश्‍यक वाहनांची ने-आण करावी. इतर बाबींची ने-आण केल्‍याचे आढळल्‍यास कडक कारवाई करण्‍यात येईल, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी बैठकीत सांगितले.
अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या वाहनांमध्‍ये माल चढविणे व उतरविणे या कामी माथाडी कामगार व हमालांची मोठया प्रमाणात गरज आहे. संचारबंदी काळात या सेवेत व्‍यत्‍यय करू नये, म्‍हणून सहाययक आयुक्‍त कामगार व अध्‍यक्ष माथाडी कामगार युनियन यांना जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सूचना दिल्‍या.
या कामगारांना ते ज्‍या ठिकाणी सेवा देणार आहेत ते ठिकाण नमूद करण्‍यात यावे. जिल्‍हयातील अत्‍यावश्‍यक सेवा घ्‍यावयाच्‍या सर्व ठिकाणी माथाडी कामगार यूनियन, हमाल यूनियन यांनी हमाल उपलब्‍ध करून दयावेत. अडचण आल्‍यास जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांचेशी संपर्क साधावा.
सदयपरिस्थितीमध्‍ये संचार बंदीच्‍या काळात कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमध्‍ये धान्‍यांची उलाढाल बंद असल्‍यामुळे ठोक विक्रेते यांच्‍याकडे मालाची कमतरता जाणवू नये, म्‍हणून नोंदणीकृत आडती यांनी ग्रामीण भागात गाळे आपसात घेवून धान्‍यांचे अंतर राखून (सोशल डिस्‍टंन्‍स) खरेदी करावी. त्‍यानूसार ठोक विक्रेते अत्‍यावश्‍यक सेवांच्‍या कृषी प्रक्रिया उद्योग याठिकाणी मालाच्या उपलब्‍धतेसाठी सहकार्य करावे. जिल्‍हयातील बेघर, अतिशय गरीब व गरजू व्‍यक्‍तींना मदत करण्‍यासाठी एमआयडीसी असोसिएशन व्‍यापारी व उत्‍पादक यांना मदतीचे आवाहन यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले. या कामात मदत देण्‍यासाठी सुसाहय व्‍हावे म्‍हणून जिल्‍हाधिकारी कार्यालयामार्फत पासेसचे वितरण करण्‍यात येणार आहे, असेही जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.
यावेळी संचारबंदीच्‍या काळात माथाडी कामगार उपलब्‍ध होण्‍याच्‍या अनुषंगाने एमआयडीसी असोसिएशन, उपनिबंधक अध्‍यक्ष, माथाडी असोसिएशन यांची बैठक घेण्‍यात आली.
000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...