Friday, January 20, 2017

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत जिल्ह्यात
29 जानेवारी, 2 एप्रिल रोजी बालकांचे लसीकरण
मोहिम यशस्वी करण्याचे, सुक्ष्म नियोजनाचे जिल्हाधिकारी काकाणी यांचे निर्देश

नांदेड दि. 20 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात रविवार 29 जानेवारी व रविवार 2 एप्रिल 2017 रोजी 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार याची दक्षता घेण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मोहिमेसाठीच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे दिले. मोहिमेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे,निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. बालाजी शिंदे, डॅा. कैलास शेळके, डॅा. डी.टी. कानगुळे यांच्यासह महिला व बालविकास तसेच शिक्षण आणि आरोग्य विभागांशी संबंधित वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, जिल्ह्यातील सन 2012 पासूनची जन्मनोंदीबाबतची माहिती एकत्रित करण्यात यावी. गावनिहाय या माहितीचे विश्र्लेषण करण्यात यावे. तसेच आधार नोंदणी क्रमांकाशीही या लसीकरणाच्या मोहिमेची सांगड घालण्यात यावी. यामुळे जिल्ह्याचा लक्ष्यांक निश्चित करणे शक्य होईल. यातून सुक्ष्म नियोजन करता येईल आणि जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. याचवेळी त्यांनी जिल्ह्यातील सूजाण नागरिक म्हणून शुन्य ते पाच वयोगटातील बालकांना या दोन्ही दिवशी पोलीस लस पाजण्यासाठी संबंधित पालकांनी जागरूक रहावे. तसेच अन्य संवेदनशील घटकांनी याबाबत जनजागरण करावे व मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील शुन्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत सुमारे 4 लाख 18 हजार 76 पालकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी जिल्ह्यात 2 हजार 686 केंद्र संख्या राहणार आहे. या केंद्राशिवाय फिरते पथकांद्वारेही प्रवासातील आणि स्थलांतरणाच्या ठिकाणी बालकांना लस पाजण्यात येणार आहे. यासाठीची लस (व्हायल्स)मध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहे. विशेषतः जोखीमीचे क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या भागातील एकही बालक लसीपासून वंचित राहू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महिला व बालविकास, शिक्षण विभागांचा सक्रीय सहभाग घेण्यात येत असून, ग्रामस्तर ते तालुका आणि शहरस्तरापर्यंत विविध घटकांना मोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षीका, मुख्यसेविका, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मोहिम  यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीबाबत डॅा. शिंदे यांनी तपशीलवार माहिती बैठकीत सादर केली. 29 जानेवारीच्या मोहिमेनंतर पुढे तीन दिवस सलगपणे ग्रामीण भागात, तर पाच दिवस शहरी भागात घरभेटींद्वारेही कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वेक्षण करून, लस पाजण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत लसीकरण मोहिमेशी निगडीत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केंद्रे यांच्यासह उपस्थित वैद्यकीय अधिकारी आदींनीही सहभाग घेतला.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...