Thursday, October 8, 2026

वृत्त क्रमांक

जिल्ह्यात 9 ते 23 ऑक्टोबरदरम्यान शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

नांदेड(जिमाका), दि. 8: जिल्ह्यात आगामी काळात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, यात्रा, मिरवणुका तसेच संभाव्य आंदोलने होणार आहेत. नवरात्रोत्सव, माहूर येथील रेणुकामाता यात्रा, दसरा, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, शीख समाजाचे विविध कार्यक्रम तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 37 (1) (3) अन्वये नांदेड जिल्ह्यात दि. 9 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 23 ऑक्टोबर 2026 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास शस्त्रे, काठ्या, लाठ्या, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू बाळगण्यास मनाई आहे. तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, जाहीर घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा प्रकारचे भाषण, हावभाव, फलक किंवा चित्रांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.

हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी व शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने विशेष परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू राहणार नाही. सभा, मिरवणूक, मोर्चा, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास तसेच ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहतील. नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हा दंडाधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...