वृत्त
निवडणूक तयारीत सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, दि. ८ :- ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. मतपेट्या व पोलीस बंदोबस्ताच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवून मुख्य नियंत्रण कक्षातून त्यांचे निरीक्षण करावे. मतदानापूर्वी पोलीस प्रशासन व संबंधित समितीची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबींचा आढावाप्रसंगी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे, मंजुषा मिसकर, रित्रा मेत्रेवार, देविदास टेकाळे, खुशालसिंह परदेशी तसेच विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. तसेच आठही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जी.श्रीकांत म्हणाले, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे. प्रत्येक केंद्रावर वीज, फर्निचर, पिण्याचे पाणी व उतारमार्ग यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात. ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेचा विचार करून आरोग्य सुविधांची व्यवस्था करावी. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. सर्व मतदान केंद्रांवर छायाचित्रणाची व्यवस्था करण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करावी.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यपद्धतीचे योग्य प्रशिक्षण द्यावे. ९, १६ व २२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रशिक्षणात मतपेटी सीलबंद करणे, मतपत्रिकेची घडी घालणे व टपाली मतपत्रिकेच्या नमुना १२ बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घ्यावीत. मतदान केंद्राध्यक्षांना निवडणूक प्रक्रियेबाबत तयार केलेले सादरीकरण दाखवावे. मतदान केंद्रे मोठ्या क्षेत्रात विखुरलेली असल्याने सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करून त्यांना ऑनलाइन प्रशिक्षण द्यावे.
प्रत्येक जिल्ह्यात आचारसंहिता कक्ष स्थापन करून प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती, निवडणूक समन्वय कक्ष व उमेदवारांच्या निवडणूक खर्चासाठी लेखा कक्ष स्थापन करावेत. निवडणूक साहित्याची मागणी समन्वय कक्षामार्फत नोंदवावी. निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची अंतिम यादी १६ ऑक्टोबरपर्यंत तयार करून टपाली मतदानासाठी आवश्यक पाकिटांची उपलब्धता सुनिश्चित करावी. टपाली मतपत्रिकांची छपाई व वाटपाचे नियोजन वेळेत पूर्ण करावे.
नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांनी मतदान केंद्रांच्या संख्येनुसार वाहनांचे सूक्ष्म नियोजन करावे. मतदान व मतमोजणीसाठी आवश्यक वाहने सुस्थितीत ठेवून पर्यायी वाहनांची व्यवस्था तयार ठेवावी. मतमोजणीसाठी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार दर्जाच्या सुमारे ३०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, निवडणूक कालावधीत त्यांना रजा देऊ नये. १५ ऑक्टोबर रोजी मतदान साहित्य, मतपेट्या, वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोर नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मतदान केंद्रांची संख्या, मनुष्यबळ, वाहतूक, सुरक्षा, प्रशिक्षण, मतदान साहित्य, टपाली मतदान व मतमोजणीच्या तयारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. विविध जिल्ह्यांतील निवडणूक तयारीतील त्रुटी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
.jpg)
.jpg)
.jpg)
No comments:
Post a Comment