कचरा मुक्त गाव व कचरा मुक्त शहरासाठी पुढाकार घ्यावा
- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) दि. 15 :- कचरा मुक्त भारतासाठी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नागरिकांनी सहभागी होऊन कचरा मुक्त गाव व कचरा मुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
स्वच्छता ही सेवा पंधरवडा व मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज शुक्रवार 15 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी संदीप कुलकर्णी, डॉ. विकास माने, तहसीलदार संजय वारकड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे खाते प्रमुख, कर्मचारी अधिकारी, शिक्षक आणि शालेय विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, घर व परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. कचरा मुक्त भारत या उपक्रमांतर्गत प्रत्येकाने स्वच्छता अभियान सहभागी होऊन आपले घर, गाव, परिसर व कार्यालयाची ठिकाणे स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खासदार डॉ. व्यंकटेश कांब्दे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ उपस्थित त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय ते आयटीआय पर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळेतील सुमारे साडेचार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यात विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक, स्वंयसेवी संस्था आदींनी सहभाग नोंदवला होता. स्वच्छतेविषयी असलेले विविध फलक घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. अनेक विद्यार्थी महापुरुषांचे वेश परिधान करून रॅलीत आले होते. संपूर्ण नांदेड शहर स्वच्छतेच्या घोषवाक्यांनी दणाणून गेले होते.
00000
No comments:
Post a Comment