Saturday, December 10, 2022

 विशेष लेख  :

 

राज्याच्या वैभवाची नांदी :

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग

 

सन 1995 पर्यंत राज्यातील महामार्गांची स्थिती एका आव्हानात्मक पातळीवर पोहचलेली होती. ती या अर्थाने, ज्या गतीने वाहनांची नोंदणी राज्यामध्ये होती त्या वाहनांची संख्या व उपलब्ध असलेल्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाची स्थिती रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून परीपूर्ण असणे अत्यंत गरजेची होती. राज्यातील मुंबई-पुणे, पुणे-कोल्हापूर, मुंबई-नाशिक, मुंबई-गोवा, मुंबई-नागपूर, मुंबई-सोलापूर व राज्याच्या इतर भागाला जोडणारे महामार्ग विकसीत होणे आवश्यक असल्याचे त्या काळातील सर्वच रस्ते वाहतूक तज्ज्ञांनी आग्रहाने सांगितले होते. एकाबाजुला मर्यादीत रस्ते, दुसऱ्या बाजुला या मार्गांवर वाढलेल्या वाहतुकीची संख्या हे गणित वाहतूक कोंडीला जागोजागी निमंत्रण देणारे होते.

 

मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक या महामार्गावरील वाहतुक कोंडी ही महिन्यातील अनेक दिवस पाच-पाच तासांच्या पुढे असायची. ही स्थिती नवीन एक्सप्रेसवे होईपर्यंतची होती. दोन तासात पुण्यावरून मुंबईला पोहचू हे तेंव्हा दिवास्वप्न होते. कालांतराने अभियंत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून हा मार्ग विकसित केला. वाहनाच्या गतीच्या तुलनेत ज्या प्रमाणात जिथे कुठे आवश्यक असेल तेवढ्या रुंद आकाराचे वळण यात ठेवण्यात आले. वाहनाच्या गतीप्रमाणे चालकाच्या लक्षात येईल अशा पद्धतीने काही कि.मी. अगोदर पासून रस्त्याला दिशादर्शक असणारे साईनबोर्डस् यामुळे चालकांना कमालीची सुविधा झाली. अपघाताचे प्रमाण रस्त्यांमुळे न होता केवळ मानवी चुकांपुरते मर्यादीत व्हायला वेळ लागला नाही.

 

सन 2000 पर्यंत म्हणजेच 22 वर्षाखाली मुंबई-सोलापूर, मुंबई-कोल्हापूर, नागपूर-अमरावती अशा चारपदरी, सहापदरी मार्गांनी महाराष्ट्रातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम व्हायला सुरूवात झाली. महाराष्ट्राच्या रस्ते वाहतुकीतील एक आदर्श मापदंड ठरणारा नवा अध्याय आता नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या रुपाने निर्माण होत आहे. या महामार्गाच्या माध्यमातून हजारो गावांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ज्या शिवारातून हा रस्ता धावत आहे त्या शिवारातील भाजीपाल्यापासून ते अनेक वैविध्यपूर्ण असलेल्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना विक्रीचे नवी बाजारपेठ यातून साकारत आहे. ही बाजारपेठ, विक्री केंद्र टोल नाक्याच्या आजूबाजूला, हॉटेल्स व विसाव्याच्या ठिकाणी उपलब्ध होत आहे.

 

विकासाचा मार्ग हा दळण-वळणाच्या, वाहतुकीच्या भक्कम सुविधेतूनच विकसित होत असतो. हा मार्ग कृषि क्षेत्रापासून, ग्रामीण उद्योगापासून सर्वांना प्रवाहित करतो. ती सुविधा आता उपलब्ध होऊ घातली आहे. महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा म्हणून या महामार्गाकडे पाहिले जात आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील पहिल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला संपूर्ण समर्थन देऊन हा प्रकल्प साकारण्यात ज्यांनी महत्वपूर्ण पाठराखण केली, योगदान दिले असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या महामार्गाला दिले गेले आहे. ही भाग्यरेषा आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या  नावाने पिढ्यानपिढ्या जपली जाईल.

 

राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून उद्घाटन सोहळ्याच्या पूर्व तयारीला एक दिशा दिली. रविवार दिनांक 11 डिसेंबर 2022 पासून हा महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केला जात आहे. राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांतीचे नवे मार्ग यातून भक्कम होतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा हा लोकार्पण सोहळा राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

-         विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

 

समृद्धी महामार्गाविषयी :

नागपूर मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा महत्वाचा प्रकल्प म्हणुन अधिसुचित करण्यात आला आहे. सदर महामार्गास दिनांक 22 डिसेंबर, 2019 रोजीच्या शासननिर्णयाव्दारे "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग" असे नाव देण्यात आले आहे.

• पुर्ण प्रकल्पाला पर्यावरण विषयक, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण विभाग यांची मंजूरी प्राप्त झाली आहे. 

• सद्यस्थितीत प्रकल्पासाठी लागणारी 8861.02 हेक्टर जमीन (रस्त्याची रुंदी + इंटरचेंज) संपादित करण्यात आली आहे.

• सदर प्रकल्प 16 पॅकेजमध्ये विभागण्यात आला आहे. संपूर्ण प्रकल्प माहे जुलै 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

• प्रकल्पामध्ये वन्यजीव संरक्षणासाठी एकुण 84 बांधकामे प्रस्तावित होती तथापि गरजेनुसार ही बांधकामे 100 पर्यंत वाढविण्यात आली आहेत, त्यांची रचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. 

सद्यस्थितीत 1 ते 11 (शिर्डी पर्यंत) पॅकेजेसचे काम पुर्ण झाले आहे.

पहिला टप्पा म्हणून, नागपूर ते शिर्डी 701 किमी पैकी 520 किमी लांबीचा रस्ता, वाहतुकीसाठी तयार आहे त्याचे लोकार्पण होत आहे. जुलै 2023 पर्यंत उर्वरित महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...