Tuesday, January 23, 2018

नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करतांना
वैयक्तीक माहिती गोपनीय ठेवावी
माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयी कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 23 :- नागरिकांनी ऑनलाईन बँकींग, ऑनलाईन शॉपींग आणि सोशल मिडियाचा वापर करतांना आपल्या खात्यासंबंधी वैयक्तीक माहिती गोपनीय ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. "महाराष्ट्र सायबर" ट्रान्सफॉर्मिग अंतर्गत माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयक प्रशिक्षणाचे आयोजन सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांनी सायबर गुन्ह्याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.  
यावेळी पोलीस निरीक्षक श्री शहाणे म्हणाले, नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या फसव्या फोन कॉल्स पासून सावध रहावे, बक्षीस किंवा लॉटरी संदेशाकडे दुर्लक्ष करावे, एटीएमकार्ड व पासवर्ड काळजीपूर्वक वापरावे. वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी, मोबाईल किंवा संगणकावरुन सुरक्षित https आणि पॅडलॉक असलेल्या संकेतस्थळाचाच वापर करावा. ऑनलाईन शॉपींग करताना सुरक्षित संकेतस्थळाचा वापर करावा. एटीएम मशीनमध्ये कार्ड वापरताना त्याठिकाणी यंत्र चिटकवले आहे काय ? याची खात्री करुन एटीएम कार्ड वापरावे. एटीएम मशीनच्या ठिकाणी किबोर्डच्या दिशेने सुक्ष्म कॅमेरा बसविण्यात आलेला नाही याची खात्री करावी. पीनकोड अनओळखी व्यक्तीला दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. बॅक खात्यासंबंधी माहितीची पावती कचऱ्यात न टाकता वापर झाल्यानंतर पावती नष्ट करावी किंवा अनोळखी व्यक्तीच्या हाती पडणार नाही याची दक्षता घ्यावी. मौल्यवान वस्तु एटीएम सेंटरमध्ये विसरुन जाऊ नये. बँक खातेधारकांना कधीही एटीएम संबंधी माहिती फोनवर विचारल्या जात नाही. अशावेळी फोनवर एटीएम संबंधी विचारणा करणाऱ्या व्यक्तीला माहिती न देता नजीकच्या बँक शाखेत संपर्क करावा. सोशल मिडिया वापरताना धार्मिक, जातीय, राजकीय, सामाजिक भावना दुखावतील असे मजकूर, छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप्स तयार करुन पोस्ट करणे, लाईक, शेअर, कमेंट, फॉरवर्ड, प्रसारित करणे हा दंडनिय व दखलपात्र गुन्हा आहे. सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास तात्काळ डिलीट करावी, असे सांगितले.
या संबंधीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत जवळच्या बॅक शाखेशी किंवा पोलीस स्टेशनशी त्वरीत संपर्क साधुन तक्रारी करावी.  सायबर गुन्ह्याचे प्रकार फिशींग, हॅकींग, पोर्नोग्राफी, सोशल मिडिया वापर, एटीएम फ्रॉड आदी विषयी माहिती देऊन नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर क्राईम पासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्री शहाणे यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने फसवणूक झालेल्या नागरिकांच्या चुकांबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सिरसेवाड, श्री राठोड, जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, काशिनाथ आरेवार यांनी केले. यावेळी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.   
00000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...