Saturday, April 20, 2024

 वृत्‍त क्र. 367

पूर्ण दिवस सुटी द्या... नाहीतर किमान 2 तास मतदानाला वेळ द्या !

कामगार, मजूर, वेटरपासून , मेकॅनिकपर्यंत सर्वाना 26 एप्रिलला सवलतीचे आदेश

26 एप्रिल मतदानाचा दिवस

नांदेड, दि. 20 एप्रिलः- येत्या शुक्रवारी अर्थात 26 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी अत्यावश्यक सेवेपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत आणि कामगारांपासून शेतमजूर, मेकॅनिक, वेटर या सर्वांना एक तर पूर्ण दिवसाची सुट्टी द्या. अथवा मतदान करण्यासाठी दोन तासाची सवलत द्या, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने सर्व कामगार आस्थापनांना दिले आहे.

यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत सर्व आस्थापनाची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये छोट्या आस्थापनावर असणाऱ्या रोजंदारी कामगारांपासून नियमित वेतन घेणाऱ्या पगारी नोकरदारापर्यंत सर्वांना ही सवलत मिळाली पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. नांदेड लोकसभा मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना निवडणुकीच्‍या दिवशी शुक्रवार 26 एप्रिल 2024 रोजी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी भरपगारी सुट्टी देण्‍याबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे.

या परिपत्रकानुसार सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी, व्‍यवस्‍थापकांनी कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक अमोल इंगळे व सहायक कामगार आयुक्‍त मोहसिन अ. सय्यद यांनी केले आहे.

ही सुट्टी सर्व आस्‍थापना, कारखाने,दुकाने, इत्‍यादीना लागू राहील. उदा. राज्‍य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्‍या या मधील आस्‍थापना, सर्व दुकाने व इतर आस्‍थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्‍यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्‍थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्‍या, शॉपिग सेंटर, मॉल्‍स,रिटेलर इ. अपवादात्‍मक परिस्‍थीतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्‍यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्‍य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र त्‍याबाबत त्‍यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्‍त अथवा जिल्‍हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक राहील. कोणत्‍याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्‍थापना मालकांनी घेणे आवश्‍यक राहील.

सर्व आस्‍थापना,कारखाने, दुकाने इत्‍यादींच्‍या मालकांनी , व्‍यवस्‍थापनाने या आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्‍यावी. मतदारांकडून मतदानासाठी योग्‍य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्‍त न झाल्‍याने मतदान करणे शक्‍य न झाल्‍याबाबची तक्रार आल्‍यास , त्‍यांच्‍या विरुध्‍द योग्‍य ती कारवाई करण्‍यात येईल . अशा तक्रारीचे निवारण करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय दक्षता समिती स्‍थापन करण्‍यात आली आहे.तक्रार निवारणासाठी नोडल अधिकारी म्‍हणून सहाय्यक कामगार आयुक्‍त मोहसीन अ. सय्यद (मो.क्र.7276216066) तसेच जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक अमोल इंगळे यांचा मो. क्र.  +91 9607052810 यांच्‍याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्‍यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...