वृत्त क्र. 369
मतदार जनजागृतीसाठी कामगाराशी आयुक्तानी साधला संवाद
नांदेड दि. 20 एप्रिल- नांदेड जिल्हा स्वीप कक्षाच्या मतदार जनजागृती अभियानांतर्गत सिडको येथील औद्योगिक वसाहतीतील सुरज ग्रुपच्या कामगारांशी नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी संवाद साधला.
सुरज ग्रुप इंडस्ट्रीजचे रमेश शेठ पारसेवार, राहुल शेठ पारसेवार आणि राम शेट्टी तृप्तेवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व कामगारांना मतदानासाठी एक दिवसाची पगारासहित रजा मंजूर करून भारतीय लोकशाही प्रति आपली जाज्वल्य निष्ठा दाखवली आहे. नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून आपला लोकप्रतिनिधी आपण निवडण्याच्या या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग आवश्यक असून सर्व कामगार, त्यांचे नातेवाईक, मित्र यांनी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपले सरकार आपण ठरू शकतो. आपल्याला आवडणाऱ्या उमेदवाराला आपण मत देऊन भारतीय राज्यघटनेचा आदर करू शकतो असे सांगून त्यांनी पारसेवार आणि तृप्तेवार या उद्योजकांनी कामगारांना दिलेल्या पगारी रजेबाबत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एम. कुलकर्णी यांनी केले. सर्व उपस्थिताना यावेळी मतदान करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी उपशिक्षणाधिकारी बंडू अमदुरकर, शिक्षण विस्तार अधिकारी आर. एल. आडे, मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे आदी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment