नांदेड दि. 15 :- मोझांबिक या आफ्रिकन देशामध्ये १४ ते २७ एप्रिल २०२४ या कालावधीत भारतातील रोटरी डीस्ट्रीकट 3080 व मोझांबिक मधील रोटरी डीस्ट्रीकट 9210 यांच्या संयुक्त विद्यमाने चीमोयू या शहरामध्ये विविध रोगासंदर्भात शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी भारतातील विविध विषयातील निष्णांत 18 डॉक्टरांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी महाराष्ट्रातून 2 शल्यचिकित्सकांची निवड करण्यात आली होती. या टीममध्ये स्त्रीरोग तज्ञ शल्यचिकित्सक म्हणून नांदेड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे यांची निवड करण्यात आली.
या शिबिरात वरील टीमने नेत्ररोग, कान-नाक-घसा, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्लास्टिक सर्जरी या आजारासंबंधित रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. 12 दिवस चाललेल्या या शस्त्रक्रिया शिबिरात वरील टीमने एकूण 828 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्यातील अनेक शस्त्रक्रिया ह्या अत्यंत गुंता-गुंतीच्या होत्या. मोझांबिक सारख्या गरीब देशातील जेथे वैद्यकीय साधन सुविधा अत्यंत कमी आहेत. अशा देशातील अत्यंत गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. नांदेडचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे यांची या शिबिरासाठी निवड झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा झळकले आहे. यापूर्वीसुद्धा डॉ. अनिल साखरे यांनी आफ्रिकन देशांमध्ये जाऊन विविध शस्त्रक्रिया शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे. यासंदर्भात डॉ. अनिल साखरे यांचे मनोगत जाणून घेतले असता त्यांनी या शिबिरास जाण्यासाठी संधी मिळाली याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले. त्यांनी या शिबिरात समाविष्ट करून घेतल्याबद्दल रोटरीयन डॉ. राजू प्रधान, रणजीत भाटीया, रमन आनेजा, डॉ. करणसिंग, किशोर पावडे, प्रशांत देशमुख, डॉ. देवेंद्र पालेवर, व नांदेड रोटरीक्लबचे सर्व सदस्य यांचे आभार मानले. या शिबिरास जाऊन यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment