Sunday, January 6, 2019


जागतिक शौचालय दिनानिमित्त
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे भरीव यश
सांगली, कोल्हापूर, नांदेड व वर्धा जिल्ह्यांचा सन्मान

मुंबई दि. 6 : केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील विजेत्या 12 जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याने 11 वा क्रमांक पटकावला आहे; तर विशेष सहभागाबद्दल पहिल्या 30 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, नांदेड आणि वर्धा या तीन  जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने जागतिक शौचालय दिनानिमित्त 9 ते 19 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशातील 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 412 जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये सांगली तसेच कोल्हापूर, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांनी यश मिळविले आहे. या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अभिनंदन केले आहे. 
केंद्र सरकारने मागील काही वर्षात सातत्याने आयोजित केलेल्या विविध उपक्रम आणि स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने घवघवीत यश मिळविलेले आहे. यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018’ मध्ये राज्यातील सातारा जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर राहिला. याशिवाय नाशिक आणि सोलापूर हे जिल्हे पुरस्कृत झाले. ‘स्वच्छता ही सेवा उपक्रमातही महाराष्ट्र सर्वोच्च स्थानी राहिला आहे. राज्याच्या ग्रामीण स्वच्छतेमध्ये शाश्वतता राहावी यासाठी सर्व जिल्हा परिषदांकडून भरीव प्रयत्न सुरू आहेत.
केंद्र सरकारने दिनांक 1 जानेवारी 2019 पासून ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ या स्पर्धेची सुरूवात केली आहे. यामध्ये शौचालय रंगकाम आणि त्यांची स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. या स्पर्धेतही राज्यातील सर्व जिल्ह्यात जनतेचा सक्रिय सहभाग राहील व  राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल होईल, असा विश्वास श्री. लोणीकर आणि श्री. खोत यांनी व्यक्त केला आहे.
००००

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...