Monday, January 7, 2019


डिजीटल मिडीया ठरेल चौथ्या स्तंभाचे सामर्थ्य - सुनिल ढेपे
एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात दर्पण दिनानिमित्त कार्यशाळा


नांदेड दि. 7 :- येणाऱ्या काळामध्ये वृत्तपत्राचे महत्व अनन्य साधारण होणार असल्याने वृत्तपत्रांसाठी डिजीटल मिडीया चौथ्या स्तंभाचे सामर्थ्य असणार आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी डिजीटल मिडीया सारख्या साधणांकडे वळावे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सुनिल ढेपे यांनी केले.
एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनानिमित्त एमजीएम येथे आज वर्तमानकाळातील पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि डिजीटल मिडीयाचा प्रभाव या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. ढेपे बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून दै.लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक, दै.लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, पत्रकार बजरंग शुक्ला, गोपाळ देशपांडे, पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश जोशी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना ढेपे म्हणाले की, डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. छापिल वृत्तपत्रांची जागा ई-पेपरने बऱ्यापैकी घेतलेली आहे. सन 2008 पर्यंत प्रिंट मिडीयाचा एक वेगळा दबाव समाज मनावरती होता. सद्य स्थितीमध्ये वाढत्या डिजीटल मिडीयाच्या साधणांमुळे वृत्तपत्र क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी स्वतःचे ॲप विकसीत करावे. प्रिंट मिडीयापेक्षा अधिक वाचक ई-पेपरला जोडला गेलेला आहे. ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृत्तपत्रांना उत्पन्न मिळते. वृत्तपत्र क्षेत्रात येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांना बातमी टाईप करता येणे, तिला सोशल मिडीयावर हाताळता येणे या सर्व बाबी येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी डिजीटल मिडीयाचे ज्ञान मिळविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
तर यावेळी दै. लोकमतचे पत्रकार श्री. सोनटक्के म्हणाले की, लेखणीमध्ये ताकद असेल तर प्रभावीपणे पत्रकारीता करता येऊ शकते. पत्रकारांनी समाज सेवेचे वृत्त अंगिकारुन या क्षेत्रात यावे. बाळशास्त्री जांभेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पध्दतीने पत्रकारिता केली तशी ध्येयवादी पत्रकारिता करावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
दै.लोकपत्रचे कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक म्हणाले की, आद्य पत्रकार महर्षी बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, प्र.के.अत्रे, बाळासाहेब ठाकरे, आनंतराव भालेराव यांची ध्येयनिष्ठ असलेली पत्रकारिता होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेखणीतून समाजप्रबोधनाचे काम प्रभावीपणे केले. भावी पत्रकारांनी लिहिण्याची आवड ठेवावी. बातमीतला वेगळा सेन्स ओळखावा. आपण जे काम करीत आहोत आत्मियता आणि तळमळीने केले पाहिजे. पत्रकारांनी पत्रकारितेकडे पाहताना उपजीविकेचे साधन न पाहता सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभावीपणे समाजहितासाठी लिखान करावे असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांनी अवयवदानाचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ.गणेश जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये दर्पण दिनाचे महत्त्व सांगून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. तर जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झाले. वीस वर्षापर्यंत दर्पण हे वृत्तपत्र चालले. इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये हे वृत्तपत्र प्रकाशित होत होते, असे म्हणत त्यांनी दर्पण बद्दल विस्तृत माहिती सांगितली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोविंद हंबर्डे यांनी पत्रकारांनी वाचन अधिक करणे आवश्यक असून अधिकच्या वाचनामधून प्रभावीपणे लिखान होते. समाजमन परिवर्तन करण्याचे सामर्थ्य पत्रकारितेत आहे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रशांत गवळे, सूर्यकुमार यन्नावार, सुरेश आंबटवार, शिवाजी शिंदे, तुकाराम भालेराव, विनोद कदम यांच्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, महम्मद युसूफ, प्रवीण बिदरकर, एमजीएमचे प्रा.प्रवीणकुमार सेलूकर, प्रा.राजपाल गायकवाड, प्रा.विनायक सितापराव, दिशा कांबळे, हणमंत यनवळगे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषीकेश कोंडेकर यांनी केले. आभार प्रा. राज गायकवाड यांनी मानले. प्रारंभी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दर्पण दिनाचे औचित्य साधून स्पंदन भित्ती पत्रकाचे विमोचन करण्यात आले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...