Thursday, October 19, 2023

 वृत्त 

कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट

-         पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन

कौशल्य विकास केंद्र रोजगार मंदिरे ठरतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यात ग्रामपंचायत हद्दीत 16 केंद्राची उपलब्धी

 

मुंबई, दि. 19 :- कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने महाराष्ट्राची प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची योजना महत्वपूर्ण आहे, असे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तर ही कौशल्य विकास केंद्र राज्यासाठी रोजगार मंदिरे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यातील 350 तालुक्यांत स्थापन करण्यात आलेल्या 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य (ऑनलाईन) प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

 

या प्रसंगी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथील समारंभास मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

या सोहळ्यास दूरदृश्यप्रणालीद्वारे नांदेड जिल्ह्यातील 16 केंद्रांपैकी वाकद येथील केंद्रावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे आमदार भिमराव केराम, नांदेड तालुक्यातील धनेगाव येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, प्रवीण साले, पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थी, विद्यार्थींनी यांनी सहभाग घेतला.

 

नवरात्रीचे पवित्र पर्व सुरु असल्याचा उल्लेख करत आणि त्यानिमित्ताने शुभेच्छा देतानाच पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, आईला आपल्या मुलाच्या सुख आणि यशाची काळजी असते. अशा या पवित्र काळात आपण युवकांसाठी प्रशिक्षण आणि संधीच्या दृष्टीने आगळी संकल्पना सुरु करत आहोत. या प्रशिक्षणामुळे युवकांच्या जीवनात नवी पहाट उदयास येईल. कारण जगभरात भारतातील प्रशिक्षित तरुणांना मागणी आहे. अन्य देशांमध्ये ज्येष्ठांची संख्या वाढते आहे. एका सर्व्हेक्षणानुसार जगभरातील 16  देशांमध्ये 40 लाख प्रशिक्षित युवकांची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा युवकांना या देशांमध्ये बांधकाम, आरोग्य, पर्यटन, आदरातिथ्य, शिक्षण आणि परिवहन अशा क्षेत्रात मोठी मागणी आहे. अशा कौशल्य विकास प्रशिक्षणातून आपण केवळ भारतासाठी नाहीतर, अशा देशांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

 

बांधकाम, आधुनिक शेती तसेच मनोरंजन-माध्यम क्षेत्रातील प्रशिक्षणाच्या संधीचा उल्लेख करून पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील या कौशल्य विकास केंद्रांतून विदेशात संधी आजमावू शकणाऱ्या तरुणांना काही सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देणेही उचित ठरेल. गत काळात कौशल्य विकास हा विषयच गांभीर्याने घेतला गेला नव्हता. त्यामुळे क्षमता आणि संधी असूनही युवकांना प्रशिक्षणाअभावी नुकसानच सहन करावे लागले. आता मात्र आपण कौशल्य विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे. कोट्यवधी तरुणांना पंतप्रधान कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. आजही ग्रामीण भागात कित्येक कारागिर कुटुंबात पारंपरिक ज्ञानाचा पुढे वारसा सोपवला जातो. त्यांना पाठबळाची, आधाराची गरज असते. त्यादृष्टीने आपण विश्वकर्मा श्रम सन्मान योजना राबवू लागलो आहोत. त्यांना आधुनिक उपकरणे आणि चांगले प्रशिक्षण दिले जात आहे. महाराष्ट्रातील ही 511 केंद्र या विश्वकर्मा योजनेला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

यावेळी भाषणात पंतप्रधान श्री. मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या औद्योगिकरणाबाबतच्या विचारांचाही तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक बंधनांना झुगारून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, कौशल्य विकास आणि अशा प्रक्षिणातूनच दलित, वंचित आणि मागास घटकांना अधिक प्रतिष्ठापुर्वक, सन्मानाने जगण्याची संधी मिळते. त्यामुळे याच घटकांना या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. आता ड्रोनद्वारेही आधुनिक शेती करता येता. यात आपल्या महिला भगिनींनाही संधी आहे. त्यांनाही या क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येत आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र, इंडस्ट्री फोऱ प्वाईंट ओ, सेवा क्षेत्र, नैसर्गिक शेती, कृषी औद्योगिक आणि या क्षेत्रातील मुल्यवर्धन साखळी, पॅकेजिंग अशा क्षेंत्रातील संधीचाही पंतप्रधान श्री. मोदी यांनी उल्लेख करून या क्षेत्रातील प्रशिक्षण युवकांसाठी नव्या संधीचे दरवाजे खुले करतील असा विश्वास व्यक्त केला.

 

कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील ऊर्जावान युवाशक्तीची क्षमता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, युवा शक्ती मोठे संसाधन आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मिशन सुरू केले होते. गेल्या सहा वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण घटले आहे. देशात गत नऊ वर्षात पाच हजार नवीन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र-आयटीआय सुरु करण्यात आली. यातून चार लाख उमेदवारांना प्रशिक्षण मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा ही क्रांतिकारी योजना सुरू करून पारंपारिक कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. आपण राज्याच्या अर्थसंकल्पात देखील ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ग्रामीण भागात अशी केंद्रे सुरु करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार युद्ध पातळीवर यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा आराखडा तयार केला. प्रत्येक केंद्रातून 100 उमेदवार असे प्रत्येक वर्षी सुमारे 50 हजार कुशल उमेदवार तयार होतील. आपण बेरोजगारांची फौज असे नेहमी म्हणतो... पण ही आमची कुशल फौज असणार आहे. जे उद्याच्या महाराष्ट्रात सन्मानानं नोकरी व्यवसाय करीत असतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्याच्या तळागाळात, ग्रामीण भागात, खेड्यातल्या युवकांचा कौशल्य विकास होईल. यात 30 टक्के महिला असतील. ग्रामीण भागातील कारागीरांना सुद्धा आणखी चांगले प्रशिक्षण मिळेल. आपण आयटीआयच्या प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन वाढवून 500 रुपये इतके केले आहे. बारावीनंतर 15 हजार उमेदवारांच्या रोजगार व शिक्षण-प्रशिक्षणासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत करार केला आहे. स्टार्ट अप्सना विविध पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील आयटीआयमध्ये 75 व्हर्चुअल क्लासरूम्स सुरु केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात बारा हजाराहून अधिक नवीन उद्योग व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्यांना कर्ज दिल्याचे उल्लेख करून, ही प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातील रोजगार मंदिरे बनतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

दिवंगत प्रमोद महाजन यांच्याकडे आधुनिकतेची दूरदृष्टी होती याचा उल्लेख करून राज्यात 290 रोजगार मेळाव्यांचे आयोजन केल्याचे सांगितले. त्याद्वारे 1 लाख 40 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बलशाली भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत राहील, असेही ते म्हणाले.

 

पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू

-         उपमुख्यमंत्री फडणवीस

भारत महाशक्ती होण्यासाठी बदलत्या काळाची गरज ओळखून ग्रामीण भागातदेखील कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री यांनी कौशल्य विकासाचे जे काम सुरू केले आहे त्याचे चांगले परिणाम संपूर्ण भारतभर दिसत आहेत. माननीय पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीने ही गरज ओळखून देशात कौशल्य विकास अभियान सुरू झाले आहे. विश्वकर्मा योजना की त्याचाच पुढील टप्पा आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून नावा रूपाला आलेली आहे आणि त्यातूनही अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपला देश अशाच प्रकारे प्रगती करत राहिला तर जगातील मोठी तिसरी अर्थव्यवस्था म्हणून लवकरच आपण झेप घेवू. 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू झाली आहेत. इथेच आपण थांबणार नसून राज्यात आगामी काळात ही संख्या नक्कीच वाढवून पाच हजार पर्यंत नेवू व पंतप्रधानाचे कुशल भारताचे स्वप्न साकार करू, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

 

कौशल्य विकास केंद्रांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात रोजगार क्रांती

-         उपमुख्यमंत्री पवार

राज्यात सुरू झालेली प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही राज्याच्या विकासाला चालना देणारी ठरतील.ग्रामीण भागातील ही कौशल्य विकास केंद्र ग्रामीण रोजगारामध्ये क्रांती घडवून आणतील. या केंद्रामध्ये आधुनिक युगाला आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्य आणि देशाच्या विकासाला चालना देणारी ठरेल. पी.एम.विश्वकर्मा योजना ही राज्यातील ग्रामीण कारागिरांना आपल्या विकासासाठी उपयुक्त ठरत आहे.देशाला महासत्ता बनवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना महाराष्ट्र राज्य आपल्याला सदैव आपल्या पाठीशी आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 

केंद्र युवकांसाठी उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्राधान्य दिले असून हीच बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य देखील राज्यातील प्रत्येक गावागावात कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यामध्ये जी 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र होणार आहेत त्यामध्ये ग्रामीण भागाला पूरक असणाऱ्या व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर जागतिक स्तरावर लागणाऱ्या योग्यतेचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. गावातून कोणत्याही व्यक्तीला रोजगारासाठी शहराकडे येण्याची गरज यामुळे भासणार नाही अशा प्रकारे नव्याने उभारलेल्या कौशल्य विकास केंद्रे राज्याच्या विकासासाठी आणि गावांना सक्षम करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरतील असेही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.

 

सुरवातीला भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते कळ दाबून प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य सचिव श्री. सौनिक यांनी सुत्रसंचालन केले. कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांनी आभार मानले.

 

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राविषयी...

कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र असे ब्रीद घेऊन राज्यातील 350 तालुक्यांमधील 511 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 511  केंद्र. ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण मिळणार. कृषिपूरक पारंपरिक व व्यावसायिक कौशल्य क्षेत्रातील प्रशिक्षण. पी.एम. विश्वकर्मा योजनेसाठी ही विकास केंद्र उपयुक्त ठरणार. या केंद्रामध्ये एकावेळेस जास्तीत जास्त 2 जॉब-रोल्सचे प्रशिक्षण प्रदान करण्यात येईल. अल्प कालावधीत (साधारणत:3 महिने) पूर्ण होवू शकणारे (किमान 200 व कमाल 600 तास प्रशिक्षणाचा कालावधी) अभ्यासक्रमाची निवड जिल्हा, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत करण्यात येईल. प्रत्येक प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रात वर्ष 2023-24 करिता एकूण 100 उमेदवारांचे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात येईल. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये किमान 30 टक्के महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. या केंद्रातून दरवर्षी सुमारे 50 हजार युवक-युवतीं कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे रोजगारक्षम होतील.

 

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची

वाकद येथील केंद्रावरून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण युवकांसाठी प्रगतीचे महाद्वार ठरणाऱ्या या अभिनव प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचेही दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्रातील सर्व केंद्रासमवेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. भोकर तालुक्यातील वाकद येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभास खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार गजानन घुगे, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी आर.बी. गणवीर, भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विश्वंभर कंदलवाड उपस्थित होते. 

0000








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...