Thursday, March 24, 2022

 होट्टल सांस्कृतिक महोत्सवाच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- नांदेड जिल्ह्यातील चालुक्यीन परंपरेचा वारसा लाभलेले, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा राज्यांच्या सिमावर्ती भागात असलेल्या होट्टल नगरी येथील महोत्सवाची परंपरेचे हे तीसरे पुष्प एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे गुंफले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 9, 10 व 11 एप्रिल 2022 रोजी पर्यटन संचलनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जाहिर करण्यात आले आहे. 

होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 च्या नियोजनात्मक आयोजनाकरीता स्थानिक स्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 22 मार्च 2022 रोजी महोत्सव आयोजनाच्या प्राथमिक बैठकीत हे निर्देश दिले होते. 

या समित्यांमध्ये मुख्य नियंत्रण समिती, स्वागत समिती, व्यासपीठ-मंडप-स्टॉल उभारणी समिती, सुरक्षा समिती, प्रसिद्धी व वार्तांकण समिती, निमंत्रण पत्रिका समिती, सांस्कृतिक व कार्यशाळा कार्यक्रम समिती, भोजन व जलपाण व्यवस्थापन समिती, नियामक समिती, वैद्यकीय सेवा-स्वच्छता समिती यांचा समावेश आहे. या समित्यांचे संचलन सुयोग्यरित्या करण्यासाठी समिती प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या आदेशात नमूद करण्यात आलेल्या समित्यांसमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी देखील समिती प्रमुखांवर देण्यात आली आहे. 

समिती प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कामी नियुक्त करावयाचे आहे. नियुक्तीचे आदेश, त्यात केलेले बदल, बदललेले भ्रमणध्वणी क्रमांक या अनुषंगाने वेळोवेळी मुख्य नियंत्रण समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत. यात कुठलीही नियुक्ती नियमबाह्य व परस्पर होणार नाही याची समिती प्रमुख यांनी खात्री करावी. 

प्रत्यक्ष महोत्सवाच्या तारखा म्हणजे 9 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत सर्व समिती प्रमुखांनी त्यांच्या समिती मधील आदेशाव्यतिरिक्त जास्तीत-जास्त 10 अधिकारी-कर्मचारी (प्रती समिती) यांची नियुक्ती होट्टल येथील कार्यक्रम स्थळी करावी. त्याबाबत मुख्य समिती व भोजन-जलपान व्यवस्था समिती यांना 5 एप्रिल 2022 पूर्वी अवगत करण्याची तसदी घ्यावी, जेणेकरून व्यवस्थापनातील एकसंघता कायम राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.   

समितीचे सदस्य व समितीकडे सोपविण्यात आलेले कार्य पुढील प्रमाणे आहेत. यात मुख्य नियंत्रण समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे या समितीचे प्रमुख असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, औरंगाबाद पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी एस. के. आडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी प्रशांत तातोडे, उपचिटणीस मकरंद दिवाकर हे सदस्य आहेत. या समितीचे कार्यात कार्यक्रमासाठी आवश्यक ती समिती स्थापन करणे, कार्यक्रमासाठी आवश्यक निधी संकलनाचे काम, कार्यक्रमाचे आयोजन निश्चित करणे, प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश निर्गमीत करणे, निधी संकलनासाठी आमदारांची मान्यता प्राप्त करून घेणे, विविध विषयांच्या निविदा प्रक्रिया अंतिम करणे, नियोजीत कार्यक्रमासाठी मुंबई येथील पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक यांची परवानगी घेणे, नियोजन विभागाकडील निधी मंजुरी संबंधाने पत्रव्यवहार व मंजुरी प्राप्त करून घेणे, लेखे संबंधाने संकलन व अनुषंगीक कामे करणे ही आहेत. 

स्वागत समितीचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे प्रमुख आहेत तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम हे सदस्य आहेत. या समितीचे कार्यात कार्यक्रमासाठी निमंत्रित करावयाच्या प्रमुख पाहुण्यांची नावे त्यांच्या तारखा, संपर्क निश्चित करणे. कार्यक्रम आमंत्रण पत्रिका निश्चित करणे, सन्मान चिन्हे निश्चित करणे, विहित काळात निश्चितपश्चात व छपाई आणि वितरणासाठी निमंत्रण पत्रिका समिती यांच्याकडे हस्तांतरण करणे, कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट नियेाजन करणे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रण पत्रे देणे, कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुण्यांचे आगमन, स्वागत समारंभाचे नियोजन, मान्यवरांना द्यावयाचे स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ संबंधी नियेाजन, प्रत्यक्ष उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करणे आहेत. 

व्यासपीठ मंडप, स्टॉल उभारणी समितीत देगलूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विद्युत विजय पुसदकर, जिल्हा कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड हे सदस्य आहेत. समितीकडील कार्यात कार्यक्रमस्थळी नियुक्त कंत्राटदाराकडून उभा करावयाच्या मंडपाचा आराखडा तयार करून त्यानुसार व्यासपीठाची उभारणी, सुरक्षितता, मजबुतीच्या अनुषंगाने पर्यवेक्षण, प्रमाणीकरण करणे. नियुक्त कंत्राटदाराकडून विद्युत पुरवठा अविरत राहण्यासंबंधाने (जनरेटर तत्सम), प्रत्यक्ष कार्यन्वहन, सुरक्षितता प्रमाणीकरण. परिसरात लावण्यात येणाऱ्या विविध स्टॉल्सचे आरेखण, उभारणी, विविध सेवा जसे पाणी, विद्युत पुरवठा देणे, सांस्कृतिक व्यासपीठ, ध्वणीक्षेपण यंत्रणा, होट्टल मंदीर व परिसरात आकर्षक विविध रंगी विद्युत रोषणाई, मंडपामधील व व्यासपिठावरील आसन व्यवस्था, स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छता समिती समवेत समन्वयन, कृषी विभाग, महिला बचतगट यांच्या स्टॉल वाटपासंबंधी कार्यान्वयन करणे, छायाचित्रकारांसाठी मुख्य कार्यक्रम स्थळी मंडपात छायाचित्रणाची व्यवस्था करणे, कार्यक्रम पश्चात विद्युत देयकांची अदायगी संबंधाने समन्वयन करणे, स्वागत समिती, प्रसिद्धी व वार्तांकण समिती समवेत समन्वय करणे, देगलूर ते होट्टल या रस्यावरील वाहतूक सुयोग्य राहण्यासाठी योग्य त्या ठिकाणी डागडुजी, अपघात प्रवण क्षेत्रात रिफ्लेक्टर्स बसविणे. 

सुरक्षा समिती पोलीस अधीक्षक प्रमुख शेवाळे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, देगलूर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, मरखेलचे पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांचा समावेश आहे. समितीचे कार्य कार्यक्रम स्थळी नियुक्त कंत्राटदाराकडून उभा करावयाच्या मंडपाची, व्यासपीठाची सुरक्षितता. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या मंडपाची विविध स्टॉल्सची व्यवस्था करणे, कार्यक्रमाचे उद्घाटन, समारोप, तीन दिवसातील इतर कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमस्थळी गर्दीचे नियंत्रण, पर्यवेक्षण, बंदोबस्त लावणे व त्यांचे सनियंत्रण करणे. नियुक्त कंत्राटदाराकडून विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी (जनरेटर तत्सम) प्रत्यक्ष कार्यन्वहन, सुरक्षितता प्रमाणीकरण, कार्यक्रमस्थळी उपद्रवमूल्य व्यक्तींचा बंदोबस्त करणे, येणाऱ्या वाहनांच्या वाहनतळाच्या ठिकाणी सनियंत्रण, प्रमुख पाहुण्यांच्या, आमंत्रित कलाकारांच्या वाहनांसाठी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक सनियंत्रण करणे, व्यासपीठ व स्वागत समवेत समन्वय साधणे ही कार्य आहेत.   

प्रसिद्धी व वार्तांकन समितीत जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, देगलूर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, जिल्हा सूचना अधिकारी प्रफुल्ल कर्णेवार, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती सविता बिरगे यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य कार्यक्रमाच्या तारखांना योग्य प्रसिद्धी देणे, कार्यक्रमासाठी आवश्यक होर्डिगचे डिझाईन तयार करणे, त्याची उभारणी ठिकाणे निश्चित करणे व प्रत्यक्ष उभारणीच्या अनुषंगाने कारवाई करून घेणे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जाहिरात तयार करणे, तयार केलेल्या जाहिरातीचे स्थानिक, राज्य पातळीवरील वृत्तपत्र, राज्य पातळीवरील इलेक्ट्रॉनिक मिडिया यांच्याकडील प्रसिद्धीच्या अनुषंगाने शासन स्तरावरील मार्गदर्शन बरहुकूम कार्यवाही करणे. दिनांक पासून ते कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे वृत्तांकन, संकलन, वृत्तपत्रांना जिल्हा प्रशासनाच्या पूर्व परवानगीचे वृत्त, छायाचित्रे पुरविणे. प्रसिद्धी वृत्तांचे संकलन करणे, डॉक्युमन्टेशन करणे. जिल्ह्यातील नोंदणीकृत वृत्तपत्र संस्थांना, इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींना कार्यक्रमाचे निमंत्रण पोहचविणे. छायाचित्रकारांसाठी मुख्य कार्यक्रमस्थळी मंडपात छायाचित्रणाची व्यवस्था करणे. स्वागत समिती व नियंत्रण समिती, व्यासपीठ मंडप स्टॉल समिती समवेत समन्वय साधणे, संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओ शुटींगच्या अनुषंगाने कार्यवाही करणे. 

निमंत्रण पत्रिका समितीत उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवतकर, समाज कल्याण अधिकारी बापू दासरी यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- नियंत्रण पत्रिका स्वागत समिती समवेत विहित वेळेत तयार करून घेवून त्यांच्या प्रती छापून घेणे, कार्यक्रमास आमंत्रित करावयाच्या निमंत्रितांची यादी राजशिष्टाचार बरहुकूम तयार करणे. निमंत्रण पत्रिका निमंत्रीतांपर्यंत पोहचतील यासाठी कर्मचारी नियुक्ती व निमंत्रण पोहचण्याची खबरदारी घेणे, निमंत्रीतांची बैठक व्यवस्था, व्यासपीठ मंडप स्टॉल समिती समवेत समन्वय साधने. प्रसिद्धी व वार्तांकन समिती समवेत समन्वय साधने व पत्रकारांना निमंत्रणे, कार्यक्रम स्थळी त्यांची बैठक व्यवस्था याबाबत खबरदारी घेणे ही आहेत. 

सांस्कृतिक व कार्यशाळा कार्यक्रम समितीत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सौ. दिपाली मोतीयाळे, औरंगाबाद पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, ज्येष्ठ साहित्यीक डॉ. मुलमुले, प्रतिनिधी सुरेश जोंधळे यांचा समावेश आहे. यात समितीचे कार्य- सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेषा तयार करणे, आंतरराष्ट्रीय कलाकारांची निवड व निश्चित करणे, स्थानिक कलाकारांची निवड व त्यापश्चात त्यांच्या कार्यक्रमाची निश्चिती करणे, कलाकारांची कार्यक्रम स्थळी व्यवस्थेचे पर्यवेक्षण व आवश्यक अनुषंगीक कामे करणे. कार्यशाळेसाठी विषय निवड करणे त्यासाठी आमंत्रित करावयाच्या मान्यवरांची यादी निश्चित करणे. प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील आवश्यक प्रकाश योजना व ध्वणी योजना या अनुषंगाने संबंधीत तंत्रज्ञानासमवेत समन्वय साधणे, पुस्तके, स्मरणिका, कॉलेंडर प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करणे ही आहेत. 

भोजन व जलपाण व्यवस्था समितीत बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, बिलोलीचे तहसीलदार श्रीकांत निळे, देगलूर गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, देगलूर नायब तहसिलदार (पुरवठा) बालाजी मिठ्ठेवाड यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- कार्यक्रमासाठी आमंत्रित प्रमुख पाहुण्यांची चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, स्वागत समिती समवेत समन्वय साधुन करणे. सर्व समितींमध्ये समाविष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्या याद्या संकलीत करुन संबंधितांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पासेस पुरविणे त्यांच्या जेवण्याची व चहाची व्यवस्था करणे हे आहे. 

नियामक समितीत देगलूरचे उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर इेरलोड, देगलूर नायब तहसीलदार वसंत नरवाडे, नांदेडचे नायब तहसिलदार मुगाजी काकडे यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- कार्यक्रमासाठी आमंत्रित प्रमुख पाहुणे यांचा राजशिष्टाचार अंतर्गत जिल्हा मुख्यालय ते कार्यक्रम स्थळ व्यवस्था बघणे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या कलाकार व त्यांच्या संचाची देगलूर शहर, कार्यक्रमस्थळी सर्व व्यवस्थेकरीता लायझनिंग करणे. कलाकारांना ने-आण करण्यासाठी वाहन, प्रवास व्यवस्था बघणे. कार्यक्रम कालावधीत निमंत्रित अधिकारी, पदाधिकारी, कलाकार यांना चहा, नाश्ता, जेवण संबंधाने भोजन जलपान समिती समवेत समन्वय ठेवणे. निमंत्रित कलाकार, अधिकारी यांची निवास व्यवस्था करणे. निमंत्रित कलाकार, अधिकारी यांची नांदेड शहरातील व्यवस्था व कार्यक्रम स्थळापर्यंतची व्यवस्था करणे ही आहेत. 

वैद्यकीय सेवा, स्वच्छता समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, देगलूरचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, देगलूरचे तालुका आरोग्य अधिकारी अशिष देशमुख, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांचा समावेश आहे. या समितीचे कार्य- कार्यक्रमस्थळी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे. कार्यक्रम काळात वैद्यकीय पथकाची स्थापना करणे. कार्यक्रम स्थळ परिसरातील सर्व प्रकारची स्वच्छता राखण्याची जबाबदारी तसेच मोबाईल टॉयलेटची उपलब्धता करून घेणे. कोविड-19 च्या अनुषंगाने लसीकरणाचा कॅम्प लावणे ही आहेत. 

या समितीकडे सोपविलेल्या कामाव्यतिरिक्त मुख्य नियंत्रक समितीकडून ऐनवेळी सोपविण्यात आलेल्या विषयांचे कार्यान्वयन करण्याची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आलेली आहे. या महोत्सवाच्या काळात समिती सदस्यांनी व त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे भ्रमणध्वनी 24 तास कार्यान्वित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी. या कार्यक्रमाची भव्यता व एकसांघिकपणा आबाधित राहील याची प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

000000 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...