Friday, November 16, 2018


  पत्रकारांनी आचारनिति पाळावी
- शंतनू डोईफोडे
नांदेड, दि. 16 :- डिजीटल युगामाध्ये वृत्तपत्रातील बातमीला महत्व आहे. सर्वसमान्य नागरिकांचा बातमीवर विश्वास असल्याने पत्रकारांची जबाबदारी अधिक असते. त्यामुळे पत्रकारांनी आचारनिती पाळावी, असे प्रतिपादन प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी केले.
नांदेड जिल्हा माहिती कार्यालय आणि एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त डिजीटल युगातील पत्रकारिता आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. डोईफोडे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोविंद हंबर्डे तर प्रमुख पाहूणे म्हणून नांदेड शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फसके, प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना डोईफोडे म्हणाले, प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात येवून घटनात्मक अधिकार देण्यात आले. त्यामुळे वृत्तपत्राचे स्वातंत्र्य अबाधित आहे. पत्रकारांनी जबाबदारीपूर्वक वृत्तांचे लिखान केले पाहिजे. नवीन युवा पत्रकारांनी या क्षेत्रामध्ये येतांना भान ठेवून आले पाहिजे. मोजक्याच पत्रकारांनी समाज मान्यता मिळते. त्यामुळे आचारनिती पाळूनच वृत्तपत्र क्षेत्रामध्ये लिखान करावे. डिजीटल युगामध्ये विदेशातील वृत्तपत्रांना परिणाम झालेला आहे. परंतु आपल्याकडे वृत्तपत्रांचे महत्व कमी होणार नाही, असे म्हणत त्यांनी मराठवाड्याचे भूषण अनंतराव भालेराव यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच जेष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या अग्रलेखावर आधारीत व्याख्यानमाला आयोजित करावी, असे देखील ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फसके म्हणाले, लोक बोलण्यावरती विश्वास ठेवत नाहीत तर वृत्तपत्रातून आलेल्या बातमीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे पत्रकारांनी चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य गोविंद हंबर्डे म्हणाले, वाचन संस्कृती डिजीटल युगामुळे लोप पावत आहे असे म्हटले जाते. परंतु डिजीटल ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक वाचक जोडले गेलेले आहेत. युवा पत्रकारांनी निकोप समाज जीवन घडविण्यासाठी अनंतराव भालेराव आणि जेष्ठ संपादक सुधाकरराव डोईफोडे, गोविंद तळवळकर यांचे अग्रलेख वाचावेत, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जोशी म्हणाले की, 16 नोव्हेंबर, 1966 पासून राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. जेष्ठ संपादक सुधाकरराव डोईफोडे यांच्या नावाने राज्य शासनाने उत्कृष्ट लेख लिखान करणाऱ्या पत्रकारांना 51 हजारांचा पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे. ही बाब नांदेडसाठी निश्चित अभिनंदनाची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगत राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्व विस्तृतपणे सांगितले. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी नवोदित पत्रकारांना राष्ट्रीय पत्रकार दिन व छायाचित्राचे महत्व सांगितले. 
कार्यक्रमात एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून यश मिळविल्याबद्दल अश्विनी केवटे, अनिता गायकवाड, नितेश कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश कोंडेकर यांनी केले तर आभार विवेक डावरे यांनी मानले.
यावेळी उमाकांत जोशी, डॉ. प्रवीणकुमार सेलूरकर, प्रा. राजपाल गायकवाड, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, पत्रकार प्रशांत गवळे, सुरेश अंबटवार, शिवाजी शिंदे यांच्यासह पत्रकार व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, काशिनाथ आरेवार, श्रीमती अलका पाटील, महमद युसूफ यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment

​ वृत्त क्र.   1232 ​ स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४५३ ग्रामपंचायतमध्ये आज सनद वाटप  प्रधानमंत्री आभासी पद्धतीने लाभार्थ्याशी संवाद स...