Monday, October 31, 2022

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता - जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

रस्ते अपघाताला रोखण्यासाठी कठोर

कायदेशीर कारवाईची आवश्यकता

-         जिल्हाधिकारी अभिजित राऊत

 

§  जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात स्थळांचा आढावा

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  नांदेड जिल्ह्यातून जात असलेल्या महामार्ग निर्मितीच्या कामामुळे वाहतूकीत निर्माण झालेले अडथळे, वाहन चालकाकडून न पाळले जाणारे नियम, अपघात प्रवण स्थळांबाबत  अपुरी असलेली सांकेतिक सुविधा आदी कारणाने अपघाताचे प्रमाण गंभीर होत चालले आहेत. याला आळा घालण्याच्या उद्देशाने आहे त्या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, वाहतुक पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागाने परस्पर समन्वयातून आप-आपल्या जबाबदाऱ्या व कायदेशीर बाबीचे कठोर पालन करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.  


 

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहीत तोंडले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर,  राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

वाहन चालविताना फोनवर बोलणे कायद्याने गुन्हा आहे. यात होणाऱ्या अपघातात जीवीत हानीचे प्रमाणही  वाढत आहे. वाहन चालकांना यांची माहिती असूनही जर ते फोनवर बोलत वाहने चालवित असतील तर अशा चालकांविरुध्द कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी वाहतूक पोलीसांना दिले. यासाठी 250 ए कलमानुसार दंडही संबंधिताना लावला पाहिजे. रस्त्यात होणाऱ्या अपघाताला जखमीना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा दुताची संख्या वाढावी व लोकांच्या मनात याबाबत जर काही गैरसमजुती असतील तर त्या पोलीस व आरोग्य विभागानी दूर केल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.


 

नांदेड मधील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षात घेता शाळा, महाविद्यालयामध्ये रस्ते सुरक्षिततेवर भर द्यावा लागेल. या जागृतीतून रस्त्यावर जबाबदार वाहतूक होवून अपघाताचे प्रमाण कमी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या बैठकीत चाकूर ते लोहा, लोहा ते वारंगा, वारंगा ते महागाव, अर्धापूर ते हिमायतनगर व जिल्हा अंतर्गत मार्गावरील ब्लाक स्पॉट अर्थात अती धोक्याच्या अपघात स्थळांची माहिती घेवून त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

0000

 

 

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...