Friday, October 29, 2021

 अन्न व्यावसायिकांनी परवाना / नोंदणी घेवूनच व्यवसाय करावा

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 29 :- सणासुदीच्या दिवसात मिठाई व फराळाचे पदार्थ यांना मोठया प्रमाणात मागणी वाढते. या दिवसात बरेच व्यावसायिक मिठाई व फराळाचे पदार्थ उत्पादन व विक्रीचा व्यवसाय सुरु करतात. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीनुसार सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेणे बंधनकारक आहे. अशा सर्व व्यावसायिकांनी आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय सुरु करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

परवाना व नोंदणीसाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. आवश्यक शुल्क ऑनलाइन भरावे. अन्न व्यवसायाच्या स्वरुपानुसार आवश्यक कागदपत्रे तसेच शुल्क वरील संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. अन्न व्यावसायिकांना परवाना किंवा नोंदणीसाठी काही अडचण असेल तर त्यांनी helpdesk-foscos@fssai.gov.in या ई-मेलवर किंवा 1800112100 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण यांचे आदेशानुसार सुटया(लुज) स्वरुपात विक्रीसाठी प्रदर्शित केलेल्या भारतीय पारंपारीक मिठाई या अन्नपदार्थच्या ट्रे किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर दिनांक टाकणे बंधनकारक केले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा (पपरवाना व नोंदणी अधिनियम 2011) मधील इतर परवाना क्रमांक 2 नुसार मिठाई व्यावसायिकांनी नोटीस बोर्डवर मिठाईचे स्वरुप घटकपदार्थ प्रदर्शित करणे आवश्यक आहे. ही बाब ग्राहकहिताच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे अन्न व औषध विभागाने स्पष्ट केले आहे.

मिठाई व्यावसायिकांनी या तरतुदीचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. जे व्यावसायिक या तरतुदीचे पालन करणार नाहीत त्यांचेवर उचित कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे अन्न व औषध प्रशासनाने आवाहन केले. सर्व मिठाई उत्पादक व विक्रेत्यांना पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यातर्गत आवश्यक परवाना/नोंदणी आस्थापनेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावा. मिठाई उत्पादनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक खवा व इतर घटकपदार्थ परवाना व नोंदणी धारक आस्थापनाकडूनच खरेदी करावेत. अशा प्रकारे ग्राहकांना स्वच्छ व सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व मिठाई व्यावसायिकांनी वरील सूचनांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...