Tuesday, September 27, 2016

लेख

जिल्ह्याच्या आरोग्यपुर्णतेसाठी
आरोग्य विभागाची विविध रुग्णालये प्रयत्नशील

सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नांदेड जिल्हयातील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहेत. ही सर्व रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. या रुग्णालयात विविध राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत आरोग्य सेवा पुरविल्या जातात. नांदेड जिल्हयात एप्रिल, 2015 ते जून, 2016 अखेर उपलब्ध करुन दिलेल्या आरोग्य सेवांचा आढावा या लेखात घेतला आहे.
            जिल्हयात एक स्त्री रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय व 12 ग्रामीण रुग्णालय आहेत. या जिल्हयातील रुग्णालयांमध्ये या कालावधीत 2 लाख 79 हजार 603 आंतररुग्ण सेवा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या कालावधीत 1 हजार 647 लहान शस्त्रक्रिया 396 मोठ्या शस्त्रक्रिया व 2 हजार 897 प्रसूति करण्यात आलेल्या आहेत. 1 लाख 8 हजार 792 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी व 26 हजार 505 रुग्णांची क्ष-किरण तपासणीही करण्यात आलेली आहे.
।। माता बाल संगोपन कार्यक्रम।।
            बालके ही उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. म्हणून सुदृढ बालक जन्माने येण्यासाठी मातेने योग्य काळजी घेतली तर निरोगी बालके जन्माला येतील. त्यासाठी गरोदरपणातील मातेच्या तपासण्या, आरोग्य, आहार, रुग्णालयात प्रसूती, जन्मानंतर त्वरीत स्तनपान, बाळाचे लसीकरण या सर्वावर आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हयात माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत 2 हजार 897 गरोदर मातांना व 1 हजार 893 बालकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत. माता व बालमृत्यु दर कमी करण्यासाठी संस्थात्मक प्रसुतीसाठी प्रोत्साहन देण्याकरिता जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमही राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत 36 हजार 136 गरोदर मातांना  व 1 हजार 214 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आलेली आहे.
।। जननी सुरक्षा योजना।।
            जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून संस्थात्मक प्रसुतींना प्रोत्साहन देण्यात येते. अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलांना नॉर्मल प्रसुतीसाठी 600 रुपये व सिजेरियन प्रसुतीसाठी 19 हजार 500 रुपये अनुदान या योजनेतंर्गत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जिल्हयात या योजनेतंर्गत 2 हजार 751 गरोदर मातांना 18 लाख 90 हजार 180 रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे.
।। मानव विकास कार्यक्रम ।।
            गरोदर मातांची प्रसुती सुलभ व सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी शिबीरे या मानव विकास कार्यक्रमांतर्गत घेण्यात येतात. जिल्हयात 10 शिबीरांचे आयोजन करण्यात आले. 845 गरोदर व स्तनदा मातांना आणि 305 बालकांना आरोग्य सेवा देण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, जमातीतील व दारिद्रय रेषेखालील 8 गरोदर मातांना प्रत्येकी 4 हजार रुपयाप्रमाणे बुडीत मजूरी पोटी 32 हजार रुपये एवढी रक्कम वितरीत करण्यात आली.
            जिल्हयात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातंर्गत 3 हजार 987 मोतिबिंदू शस्त्रक्रिया व 93 हजार 750 शालेय विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. दोन हजार 480 चष्मे वाटपही करण्यात आले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील 9 लाख 69 हजार 803 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमातंर्गत 68 मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, 283 मुलांच्या छोट्या व मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. याच कार्यक्रमातंर्गत 301 कुपोषित बालकांना औषधोपचार करुन त्यांचे श्रेणीवर्धन करण्यात आलेले आहे.
            मनोधैर्य वाढविण्यासाठी व वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमाची नोव्हेंबर 2015 पासून जिल्हयात अंमलबजावणी करण्यात येत आहे. 30 जून 2016 अखेर विविध आजारांसाठी 30 हजार 164 शेतकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय सेवा त्वरेने मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (टोल फ्री 108) अंतर्गत 25 रुग्णवाहिकीने 20 हजार 502 रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हयातील मधुमेह, उच्च रक्तदाब, पक्षाघात, सर्व प्रकारचे कॅन्सर व मौखिक आरोग्य तपासणी करुन 7 हजार 992 रुग्णांना त्यांच्या आजारा करिता आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जिल्हयात पीसीपीएनडीटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने लिंग गुणोत्तर प्रमाणात 32 ने वाढ झालेली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत 844 हृदय शस्त्रक्रिया 838 रुग्णांच्या किडनीच्या आजारावरील उपचार, इतर रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.
            निरोगी जीवनासाठी आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग विविध योजनांच्या माध्यमातून गरीब व गरजू जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरवित असते. जिल्हयात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील रुग्णालये त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत. या आरोग्य सुविधा सर्वापर्यंत पोहचत आहेत त्याचा लाभ घेऊन आरोग्य सुदृढ ठेवावे.

-         दिलीप गवळी ,
जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

000000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...