Tuesday, May 30, 2017

उद्याच्या अंकासाठी लेख-

तंबाखू हानीकारक... विकासाला मारक...!
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन

तंबाखू अनेकांच्या प्रतिष्ठेचा विषय. प्रतिष्ठेचा याचसाठी की, अनेकांना आपण तंबाखू खातो, आणि त्यातही ब्रॅण्ड आणि उंची दर्जा राखतो, हे सांगण्याची भारी हौस. पण तंबाखू कुणाच्याच हिताची नाही. हे स्पष्ट आहे. त्याचमुळे जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू- विकासाला धोका असे घोषवाक्य निश्चित केले आहे.  
तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे तंबाखू कोणत्याही स्वरुपात शरीरात घेतली जाऊ नये यासाठी अनेकविधरित्या जनजागृती केली जाते.  त्यासाठी आंतरराष्ट्रीयस्तरावरही निक्षून प्रयत्न केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या चाळीसाव्या वर्धापनदिनात तंबाखूविरोधी मोहिम निश्चित झाली. त्यानंतर पुढे 1987 पासून 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तंबाखूचे सेवन, धुम्रपान किंवा अन्य कोणत्याही स्वरुपात शरीरात घेण्याने कर्करोगाची सर्वाधिक शक्यता असते. दरवर्षी तंबाखुमुळे कर्करोग आणि त्यातून होणाऱ्या मृत्युंची संख्या जागतिकस्तरावर सत्तर लाखाच्या घरात आहे. यात अविकसित, गरीब देशातील नागरिकांचीच संख्या सर्वाधिक असते. भारतात दरवर्षी तंबाखूमुळे कर्करोग होणाऱ्यांची आणि त्यामुळे मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्या सुमारे दहा लाखांच्या दरम्यान आहे.
        अमेरिका खंडाकडून युरोप खंडात तंबाखूचा प्रसार झाला व तेथील पोर्तुगीज व्यापाऱ्याकडून तो भारतापर्यत पोहचला . भारतात तंबाखूचा वापर अनेक शतकांपासून होतो आहे. सुरवातीला चघळणे, धुम्रपान यातच तंबाखूचा वापर होत असे. पण हा मर्यादीत वापर आता कित्येक पटींनी वाढला आहे. कारण आता तंबाखूपासून अनेक उत्पादने तयार करण्यात येतात, किंवा अनेक उत्पादनांत तंबाखुचा वापर केला जातो. धुम्रपानात सिगारेट, विडी, हुक्का, चिलीम याद्वारे तंबाखू वापरली जाते. तर चघळण्याच्या प्रकारात खैनी, गुटखा, तंबाखूमिश्रीत पान, पानमसाला, मावा, मिशरी, हुंगण्यासाठीची कोरडी तंबाखू –तपकीर अशा स्वरुपात तंबाखुचा वापर केला जातो.
तंबाखूमध्ये चार हजार पेक्षा जास्त विषारी रसायने असतात. त्यातील निकोटीन, कार्बन मोनोक्साइड व टार हे अतिशय घातक घटक आहेत. निकोटीन हा तंबाखूची सवय लावणारा मुख्य घटक आहे. यामुळे व्यक्तीचे तंबाखूवरील शारीरिक व मानसिक अवलंबन वाढते. खरेतर, निकोटीन हे अतिशय विषारी रसायन आहे, त्याचा एक थेंब ही जीवघेणा असतो.  तंबाखू न खाता अप्रत्यक्षरित्या नुसत्या धुराच्या सेवनाने ( Passive Smoking ) मुळे  सहा लाख लोकांचा मृत्यू ओढवतो. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारामध्ये  हृदय विकार, पक्षघात, आंधळेपणा, तोंडाचे विकार, आतड्यांना फोडे येणे, दमा, फुफुसांचे विविध आजार, गँगरीन, पोटाचा अल्सर, हाडे ठिसूळ होणे, नपुसंकत्व येणे व कर्करोग होणे असं गंभीर आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनाही तंबाखुच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. तंबाखूच्या धुरामुळे जन्माला येणाऱ्याला बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
तंबाखूमुळे पर्यावरणावरही विपरीत परिणाम होतो. सिगारेटची थोटके  नदी, तलाव, सरोवरात आणि समुद्रात टाकली जातात. ही थोटके सागरी पक्षी, प्राणी, मासे गिळतात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
       जग तंबाखूमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतानेही सहभाग दर्शविला आहे. देशाच्या आरोग्य धोरणामध्ये तंबाखूचा वापर कमी करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आह. त्यानुसार सन 2020 मध्ये हे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी करण्याचा, तर पुढे 2015 पर्यंत 30 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
         भारतामध्ये सन 2003 पासून तंबाखू विरोधी कायदा ( COTPA ) पास करण्यात आला. या कायद्या अंतर्गत कलम (4) नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. कलम (5) अंतर्गत प्रत्याक्षात व अप्रत्याक्षात तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाची कोणत्याही स्वरूपातील (आवाजी, दृश्य स्वरूपातील छपाई ) जाहिरात करणे दंडनीय आहे. तसेच तंबाखूजन्य उत्पादन करणाऱ्या कंपनीनी खेळ अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई आहे. कलम (6) अ नुसार 18 वर्षाखालील मुलांना विक्रेत्यांनी तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणे दंडनीय आहे . कलम (6) ब नुसार शैक्षणिक संस्थाच्या ( शाळा, महाविद्यालय) इत्यादीच्या आवारापासून (100) यार्ड पर्यंत तंबाखूची विक्री करणे दंडनीय आहे असे करताना कोणी अढलयास दोनशे रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.
              तंबाखू, जशी व्यक्तीगत आरोग्याला हानीकारक आहेच. त्याचप्रमाणे तंबाखु तिचा वापर न करणाऱ्यांनाही धोका पोहचवू शकते. कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्याही तंबाखूचे दुष्परिणामच समोर आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखू-विकासातील अडसर किंवा धोका किंवा तंबाखू-तुम्हा-आम्हासाठी धोका..ही घोषवाक्य इशारा देणारीच आहे. त्यामुळे तंबाखूपासून दूर राहण्यातच आपले आणि समाजाचे हित आहे.
निशिकांत तोडकर,
    माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड.

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...