Thursday, January 7, 2021

 

लोकाभिमुख प्रशासनासाठी

कार्यालय प्रमुखांची तत्परता आवश्यक

-         विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- सर्वसामान्य जनतेची कामे प्रशासन स्तरावर त्वरित मार्गी लागण्यासाठी शासकिय यंत्रणेने सदैव तत्पर असले पाहिजे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक जागरुकता बाळगून त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रश्नांचा त्वरित निपटारा झाला पाहिजे, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्यक्त केली. नांदेड जिल्ह्यातील विविध शासकिय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर यांनी याबाबत सादरीकरण केले.   

अवैध रेतीचे उत्खनन व यात होणारे गैर व्यवहार हे केवळ महसूल विभागापुरते मर्यादित नाहीत तर पर्यावरणाच्यादृष्टिनेही हा प्रश्न अत्यंत कळीचा बनला आहे. चांगल्या पर्यावरणासाठी उपलब्ध असलेली नैसर्गिक संशाधने ही तेवढ्याच काळजीने जपत यात नियमाप्रमाणे ज्याबाबी अंतर्भूत केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करुन नांदेड जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

 

अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी, रेती वाहतूक करता येऊ शकणाऱ्या अथवा तशी क्षमता असणाऱ्या प्रत्येक वाहनांना जीपीएस बसवून व याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी रेतीचे घाट आहेत त्या सर्व ठिकाणी जीपीएसचे फेन्सिंग बसवून कसा आळा घालता येऊ शकेल याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सादरीकरण केले. या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. परिवहन विभागाशी समन्वय साधून सदर बाब अनिवार्य कशी होईल याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देवून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले. 

प्लॉस्टिक कॅरिबॅग व इतर अनावश्यक निसर्गाला हानी पोहचविणाऱ्या वस्तुंच्या वापरावर बंदी, स्वच्छ शहर आणि खुले क्रिडांगण ही प्रत्येक शहरासाठी आवश्यक आहे. याचबरोबर आरटीपीसीआर चाचण्या कमी होता कामा नयेत. कोविड-19 चे अजूनही समूळ उच्चाटन झालेले नाही हे कायम लक्षात ठेवून त्याबाबत समाजात अधिकाधिक जनजागृतीवर भर देण्याबाबतही त्यांनी सांगितले. प्रशासनासमवेत जनतेचा सकारात्मक सहभाग घेऊन चांगल्या वातावरण निर्मितीसाठीही प्रशासकिय यंत्रणांनी काम करणे अभिप्रेत असून जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना व विकास कामांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नांदेड जिल्ह्यातील जैवविविधता जपणे व त्याचे संगोपन करणे हे आवश्यक आहे. वन विभागात जनावरांसाठी पानवठे तयार करणे, जंगली जनावरांचे संवर्धन याबाबतही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सूचना दिल्या.  

000000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...