Tuesday, January 7, 2020


छायाचित्र  मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम
नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी
-        जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 7 :-जिल्‍हयाची मतदार यादी अद्यावत व शुध्‍द करण्‍यासाठी  जिल्‍हयातील जास्‍ती जास्‍त नागरीकांनी मतदार यादीत नाव नोंदणी, दुरूस्‍ती, वगळणी करून घेण्‍यासाठी मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रमानूसार मतदार पडताळणी कार्यक्रम गुरुवार 13 फेब्रुवारी  2020 पर्यंत राबविण्‍यात येत आहे.
मतदार यादीचे पुनरिक्षण प्रत्‍यक्षात सुरू करण्‍यापूर्वी मतदार यादी अद्यावत व शुध्‍द करण्‍याच्‍या अनुषंगाने हा कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. या कार्यक्रमात जास्‍तीत जास्‍त मतदारांना सहभागी करून घेणे व तसेच मतदार यादी शुध्‍द करणे याकडे विशेष लक्ष देण्‍यात येणार आहे.
जास्‍तीतजास्‍त पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट राहण्‍यासाठी,  मयत / स्‍थलांतरीत मतदारांची नावे वगळणी करून  मतदार यादी अचूक होण्‍यासाठी 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्‍हयातील सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची नाव नोंदणी, वगळणीबाबत मतदार यादीद्वारे पडताळणी करणार आहेत.
या कार्यक्रमामध्‍ये नागरीकांनी स्‍वयंस्‍फुर्तीने पुढीलपैकी एका कागदपत्राची प्रत देऊन आपल्‍या मतदार यादीतील तपशिलाचे प्रमाणिकरण करून घ्यावे. भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्‍स,          आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी / निमसरकारी अधिकाऱ्यांचे ओळखपत्र, बॅंक पासबुक, शेतक-याचे ओळखपत्र, पॅनकार्ड, एनजीआर अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्‍मार्ट कार्ड  आणि त्‍याच्‍या पत्त्यासाठी अर्जदाराच्‍या नावे किंवा त्‍याच्‍या जवळच्‍या नातेवाईकाचे जसे पालकांच्‍या नावे असलेल्‍या पाण्‍याचे / टेलिफोन / वीज/ गॅस कनेक्‍शनचे सध्‍याचे बिल. 
या पडताळणीत पुर्वीच्‍या पुनरीक्षण कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदणी पासून वंचित राहिलेल्‍या पात्र नागरीकांना नमूना-6 वाटप करणे व त्‍यांच्‍याकडुन परत घेणे / जमा करणे मतदार नोंदणीसाठी पात्र होणा-या  नागरीकांची माहिती जमा करणे. स्‍थलांतरीत व मयत मतदारांच्‍या वगळणीसाठी नमूना-7 वाटप करणे व जमा करणे. मतदार यादीतील तपशिल दुरूस्‍ती साठी नमूना-8 वाटप करणे व जमा करणे. अशी कार्यवाही करण्‍यात येत आहे. 
दुबार, स्‍थलांतरीत मतदारांना, मयत मतदारांच्‍या नातेवाईकांना मतदार यादीतील नाव वगळण्‍यासाठी नमूना-7 मधील अर्ज, मतदार यादीतील चूका दुरूस्‍तीसाठी नमूना-8 मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, तसेच तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍याकडे सादर करता येतील, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...