Wednesday, September 8, 2021

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग 

नांदेड (जिमाका) दि. 8 :- सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून व यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. याचबरोबर आज 8 सप्टेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पातून 36 हजार 640 क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव या मोठ्या प्रकल्पातून 21 हजार 700 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे.  पुर्णा प्रकल्पाच्या (येलदरी व सिद्धेश्वर) पाणलोट क्षेत्रातुन पूर्णा नदीत 16 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. सिद्धेश्वर धरणाखाली मोठ्याप्रमाणावर पाऊस झाल्याने पुर्णा ब्रिजजवळ 1 लाख 18 हजार क्युसेस विसर्ग चालू आहे. या सर्व नद्यांचे पाणी गोदावरी नदीला येऊन मिळते. यामुळे  विष्णुपुरी प्रक्ल्पातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पाच्या 15 दरवाजातून 2 लाख 41 हजार 518 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू असल्याने गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढणे स्वाभाविक आहे. हा विसर्ग नियंत्रित रहावा यादृष्टीने विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे तो नियंत्रीत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न केला जात असला तरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह व येवा कमी झालेला नाही. नांदेड येथील जुन्या पुलावर आज 8 सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत पाणी पातळी 352.40 मिटर इतकी आहे. इशारा पातळी 351 तर धोका पातळी 354 मीटर इतकी आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2 लाख 13 हजार क्युसेस व धोका पातळीचा विसर्ग 3 लाख 9 हजार 774 क्युसेस आहे. 

विष्णुपुरी प्रकल्पातून  सोडलेला विसर्ग व गोदावरी नदीत चालू असलेला विसर्ग यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे. 

उर्ध्व मानार प्रकल्प व निम्म मानार प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. उर्ध्व पैनगंगा धरण 94.9 टक्के भरल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास गेटचे पाणी सोडण्यात येईल, अशा इशारा नांदेड पाटबंधारे विभागाने दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील गोदावरी, पैनगंगा, पुर्णा, मानार नदीकाठच्या गावातील नागरिकांनी अधिक सतर्क राहून जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...