Friday, May 19, 2017

शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात  
अडचण येणार नाही यांची खबरदारी घ्यावी
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

नांदेड, दि. 19 :-  शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिल्या.
खरीप हंगाम-2017 जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले की, शेतकऱ्यांना रासायनिक खत वाटपात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची खबरदारी घ्यावी. कृषिनिविष्ठा संबंधी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक झाल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल. जे विक्रेते नियमानुसार चांगल्या प्रकारे कृषिनिविष्ठा वाटप करतील त्यांच्या पाठिशी प्रशासन खंबीरपणे उभे राही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कृषिनिविष्ठा केंद्रधारकांनी ई-पॉस  (e-Pos) मशिन वापराबाबतचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करुन घ्यावे. रासायनिक खताची विक्री ई-पॉस  (e-Pos) मशिनद्वारे योग्य दरात करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.     
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारयांनी कृषि विभागामार्फत डीबीटी प्रकल्प राबविण्याबाबत करण्यात आलेली कार्यवाही कौतकास्पद असून खत विक्रेत्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन डीबीटी प्रकल्प यशस्वी करावा. शेतकऱ्यांना योग्य दर्जाचे, योग्य किंमतीत योग्यवेळी कृषिनिविष्ठा उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. तसेच निविष्ठा वाटपा दरम्यान कुठल्याही प्रकारची अनियमितता होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले.
जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी जिल्हयाची सर्वसाधारण माहिती तसेच खरीप हंगाम 2017 मध्ये प्रस्तावीत निहाय पेरणी ज्यामध्ये ज्वारी- 70 हजार हेक्टर, तुर- 78 हजार हेक्टर, सोयाबीन- 2 लाख 83 हजार हेक्टर कापूस- 2 लाख 65 हजार हेक्टर इतर पिके 76 हजार 575 हेक्टर असे एकूण  7 लाख 72 हजार 575 हेक्टर प्रस्तावीत पेरणी अपेक्षीत असून त्यासाठी लागणारे बियाणे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली. खरीप हंगाम 2017 करीता आवश्यक असणाऱ्या रासायन खताची मुबलक प्रमाणात उपलब्धता होणार असून रासायनिक खताबाबत टंचाई भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगामासाठी जिल्हा तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना तसेच निविष्ठा उपलब्धतेबाबत नियंत्रण कक्ष, विक्री केंद्रावर शासनाचे टोल फ्री क्रमांक, भरारी पथक क्रमांकाचे फ्लेक्स लावण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उपलब्धता, दर्जा तसेच अडचणीबाबत याचा उपयोग होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गुरुवार 1 जून 2017 पासून रासायनिक खताची विक्री e-Pos मशिन द्वारे होणार असून त्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुकास्तरीय खत विक्रेत्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती दिली. e-Pos मशिनचे सविस्तर प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 19 20 मे 2017 रोजी दोन सत्रामध्ये प्रतिसत्र चार तालुक्याप्रमाणे आज नांदेड, मुदखेड, अर्धापूर, नायगाव, कंधार, लोहा, धर्माबाद उमरी तसेच 20 मे रोजी भोकर, देगलूर, मुखेड, बिलोली,  किनवट, माहूर , हिमायतनगर, हदगाव असे अयोजीत करण्यात आले आहे. याचा खत विक्रेत्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी मोरे  यांनी  केले.
बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचे संदीप गुरमे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे मझरोद्यीन, सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. पी. पी. घुले, महाबीजचे व्यवस्थापक पी. टी. देशमुख, कृषि उद्योग विकास महामंडळाचे श्री. राचलवाड, संघटनेचे प्रतिनिधी दिवाकर वैद्य, जुगल किशोर अग्रवाल, खत कंपनीचे प्रतिनिधी, खत विक्रेते आदी उपस्थित होते. मोहीम अधिकारी ए.जी. हांडे यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...