Thursday, December 14, 2017

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीचा ठेवा

मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा दरवर्षी मार्गशिर्ष महिन्यात 14 व्या दिवशी भरते.  यावेळी ही यात्रा शनिवार 16 ते बुधवार 20 डिसेंबर 2017 या कालावधीत भरणार आहे. या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेविषयी माहिती..
महाराष्ट्र राज्याची वैभव संपन्न सांस्कृतिक परंपरा व मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते. याठिकाणी महामार्गा शेजारी खंडोबा मंदिराची मोठी कमान नजरेला पडते. त्याठिकाणाहून उजव्या बाजुला आत गेल्यानंतर भव्य मंदिर, परिसर यात्रेकरुनी दुमदुमलेला दिसतो. माळेगाव येथे पूर्व-पश्चिम असे एक मोठे आवार बांधले आहे. या आवाराच्या पूर्वाभिमूख महाद्वार आहे. या महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर खंडोबाचे मंदिर दिसते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णुची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. आठराव्या शतकातील हा शिलालेख मराठी भाषेत आहे. मल्हारी, मल्हारी मार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबादेवाची महाराष्ट्रासोबत कर्नाटक राज्यातही बारा देवस्थान आहेत.       
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक, यात्रेकरु, व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन जागृत दैवत खंडोबारायांच्या समोर भरवली जाते. यात्रेचे व्यवस्थापन नांदेड जिल्हा परिषद नियोजनबद्ध करते. देवघरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. या मुर्तीच्या देवघरासमोर एक सभागृह बांधले आहे. सभागृहाच्या मुख्यद्वारापाशी द्वारपालाच्या जागी विष्णूची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. 18 व्या शतकातील हा शिलालेख मराठीत भाषेत आहे. माळेगाव यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते.
सांस्कृतिक परंपरा
           
श्रीक्षेत्र माळेगावच्या नागरिकांचे ग्रामदैवत मल्हारी म्हाळसाकांत खंडोबा आहे. अनेकजण खंडोबास मनापासून आपले कुलदैवत मानतात. स्थानिक परंपरेनुसार दोन अख्यायिका येथील नागरिकांमध्ये अधिक रुजलेल्या आहेत. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असल्याने श्रीक्षेत्र माळेगावच्या खंडोबारायाच्या मंदिरासोबत यात्रेची देखभाल व व्यवस्था चांगली ठेवली जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचा आदर्श ठेऊन लोककला आणि मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाशा कला महोत्सव, लावणी महोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येत असतात. त्यासाठी प्रोत्साहनाच्या बक्षिसांची लयलूट होते. कुस्तीच्या आखाड्यातील फड जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविल्या जाते. कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन केले जाते. पशुसंवर्धन विभागातर्फे पशु, अश्व, कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन महत्वपूर्ण आकर्षण असते. विविध विभागाची, माहिती प्रदर्शने, वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळी, उद्योग दालने, संमेलन, मेळावे इत्यादी पाहून यात्रेकरु आपले मन आनंदाने हरवून बसावे असे सर्व काही प्रेक्षणीय म्हणजे ही यात्रा आहे. यात्रेच्या निमित्ताने देशातील विविध भागातून सर्व जातीचे-धर्माचे नागरिक एकत्र येतांना येथे दिसतात. याठिकाणी सांस्कृतिक ऐक्याचे, एकात्मतेने नटलेल्या‍ विविधतेचे दर्शन जवळून घडते. आनंद मिळवून देणाऱ्या, विविध अंगाने सजलेल्या या यात्रेत भाविकांबरोबर कलावंतांनी सहभागी होऊन महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा महोत्सवाच्या रुपाने जवळून पहावा.  

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...