Friday, November 3, 2017

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड दि. 3 :- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती , शिक्षण फी, निर्वाह भत्ता , विद्यावेतने विषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे, अर्ज भरण्यापासून ते रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी पोर्टलमार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर ही लाभाची रक्कम जमा केल्याबाबतची सुचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक महाविद्यालयाला दिली जाईल. त्यामुळे संबंधित विद्यापीठ / शैक्षणिक संस्था / महाविद्यालय / तंत्रनिकेतने यांनी कोणत्याही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम घेऊ नये. विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थांची असेल.
शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात आणि शिक्षण फी-इतर शुल्काची रक्कम विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे त्या महाविद्यालयाच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. परंतू आता देय होणारी वित्तीय लाभाची सर्व रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पुढील योजना ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क परीक्षा प्रतीपुर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ( इयत्ता अकरावी , बारावी ), राज्य शासनाची मॅट्रिकपुर्व शिक्षण फी परिक्षा फी प्रतीपुर्ती योजना, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती , सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते इयत्ता 10 वी , माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने कोअर बँकीग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आपला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, दहावी , बारावी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण रहिवास दाखल , उत्पन्न दाखला , प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, अभ्यासक्रमाचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स , आधार कार्ड , दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधा पत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.
नोंदणी कशी करावी : - आपण कोणत्याही ब्राऊझरचा वापर करुन ( उदा. internet Explorer (I.E) Google Chrome / Mozilla Firefox etc.) , https://mahadbt.gov.in या वेबसाईटवर जावून नवीन नोंदणी बटनावर क्लिक करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांने ( ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी e-scholarship पार्टलवर नोंदणी केली होती त्यांनी सुध्दा) mahadbt पार्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करुन नोंदणी करावी. तयासाठी आधार कार्ड आहे ? असेल तर होय वर क्लिक करा. त्यानंतर ओटीपी हा पर्याय निवडा , वैध आधार क्रमांका टाकल्यानंतर ओटीपी पाठवा बटन क्लिक करा, मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी ( वन टाईम पासवर्ड) टाकून पडताळणी करा हे बटन क्लिक करावे. उपलब्ध विंडोमध्ये नाव, जन्म दिनांक , फोन नंबर , पत्ता आपोआप दिसेल, आधार क्रमांक नसल्यास आधार कार्ड नाही हा पर्याय निवडा आणि आवश्यक ती माहिती भरावी व  कागदपत्रे अपलोड करावीत. नोंदणी अर्जाच्या विंडोमधील सर्व माहिती भरावी. स्वत:चा युजर नेम व पासवर्ड तयार करावा.
अर्ज कसा भरावा :- महाडीबीटी पार्टलवर लॉगइन करण्यासाठी सिलेक्ट युजरनेममध्ये जावून विद्यार्थी हा पर्याय निवडा, युजर नेम व पासवर्ड टाकून लॉगइन व्हा, लॉगइन झाल्यावर विंडोमधील योजना तपशील यावर क्लिक करा. त्यानंतर विभागवार योजना अपाण पाहू व निवडू शकाल  आपणास ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा त्या योजनेच्या नावासमोर पहा क्लिक केले असता योजनेची सर्व माहिती दिसू शकेल. त्यानंतर कोणत्या योजना ( मॅट्रीकपूर्ण / मॅट्रीकात्तर ) साठी आपण पात्र आहात त्यांची खात्री करा व पर्याय क्लिक करा. ( उदा. शालेय विद्यार्थ्यांनी मॅट्रीकपुर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॅट्रीकोत्तर हा पर्याय निवडावा ). आवश्यक ती सर्व माहिती शाळा, महाविद्यालयाचा तपशिल नमुद करावा. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत. ( रहिवास दाखला, उत्पन्न दाखला, एसएससी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक , आधार क्रमांक इ. ) . अभ्यासक्रमाचा तपशिल, मागील परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशिल इ. सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेजमधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे. विद्यार्थी / पालकाना काही अडचणी असल्यास त्यानी 18001025311 या टोल फ्री वर किंवा helpdesk@mahadbt.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.
महाविद्यालयासाठी सुचना :- महाडीबइटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे व अर्ज करण्यासाठी सहकार्य करावे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम घेवू नये. विद्यार्थ्यांना आधार क्रमांक काढणे , कोअर बँकिग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेमध्ये खाते उघडण्यासाठी सुचना द्याव्यात. आपल्या महाविद्यलयाचे नाव , महाविद्यालयास मान्य असलेल्या अभ्यासक्रमाची नावे, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालयाच्या व अभ्यासक्रमाच्या मान्यतेचे विविध आदेश याबाबतची माहिती पार्टलवर मॅप करण्यासाठी आपआपल्या आयुक्तालयास / संचालनालयास / विद्यापीठास / परिषदेस सादर करुन ती मॅप करुन घेण्याची कार्यवाही करावी. महाविद्यालय, त्यांचा अभ्यासक्रम, त्याची प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कालावधी, शुल्क रचना इ. माहिती पोर्टलमध्ये समावेश (मॅप) करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची असेल. त्यासाठी त्यामध्ये ज्या प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

****

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...