Sunday, July 12, 2020


महिलांच्या अधिकारासाठी
स्व. शंकरराव चव्हाण सदैव असायचे आग्रही
-         सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण  
जिल्हा पोलीस मुख्यालयातील भरोसा सेलचा नवीन जागेत शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 12 :- महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी नेहमीच सकारात्मक भुमिका घेतली. तीच भुमिका घरीसुद्धा त्यांनी ठेवत मला विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, असे सांगत सौ. अमिताताई अशोकराव चव्हाण यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नांदेड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने भारताचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हैद्राबाद मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक स्व. डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाचे औचित्याने जिल्हा पोलीस विभागांतर्गत भरोसा सेल च्या नुतनीकरण केलेल्या कार्यालयाचे प्रातिनिधिक उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. दिक्षाताई धबाले, सौ. राजश्रीताई हेमंत पाटील, सौ. जयश्री विजयकुमार मगर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, दत्तराम राठोड, पोलीस उपअधिक्षक अभिजित फसके, धनंजय पाटील, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक डी. जी. चिखलीकर, महिला पोलीस अधिकारी अनिता दिनकर आदींची उपस्थिती होती.
महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषींना कठोर शिक्षा ही अभावानेच पाहायला मिळते. यातील ज्या काही पळवाटा असतील त्या भरोसा सेलच्या माध्यमातून थांबवुन सर्व तपास यंत्रणा बिनचुक कार्य करेल, असा विश्वास सौ. अमिताताई चव्हाण यांनी व्यक्त केला. महिलांनीही शक्यतोवर आपल्या संसारिक जीवनातील वाद हे घरच्याघरीच सामोपचाराने मिटविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
समाजातील पिडित महिलांना अनेक पातळ्यांवर अपमान सहन करावा लागतो. विशेषत: त्यांच्या सोबत जी लहान मुलं असतात त्यांनाही त्यांचा कुठलाही दोष नसतांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास व त्यांना येणाऱ्या अडचणी या भरोसा विभागामार्फत दूर होतील, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी सांगितले.
महिलांवरील अत्याचाराच्या बहुसंख्य प्रकरणात न्याय मागतांनाही महिलांनाच अधिक प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. कोणत्याही अन्यायग्रस्ताला आपल्या आन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी कोणतेही पोलीस स्टेशन हे आपले वाटले पाहिजे, अशी अपेक्षा सौ. राजश्रीताई हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा पोलीस मुख्यालयात नव्या स्वरुपात उभारण्यात आलेला हा भरोसा विभाग सर्व महिलांच्या, अबाल वृद्धांच्या मनात विश्वास निर्माण करेल, या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील अबाल वृद्धांसह महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी पोलीस विभागामार्फत वेळोवेळी समुपदेशनासह विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत. भारताचे माजी गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व विशेषत: पिडित महिला यांना न्याय देण्यासाठी, सुरक्षा देण्यासाठी हा विभाग नव्या स्वरुपात तयार करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.
00000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...